अकोला: वाशिम जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधीत झाल्याचा पॉझिटीव्ह अहवाल आल्याचे स्पष्ट होताच या रुग्णाच्या संपर्कात अकोला जिल्ह्यातील पातुर व खेट्री येथील १३ जण आल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच त्या सर्व जणांशी संपर्क करुन सायंकाळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी तहसिलदार व पोलीस निरीक्षक घेऊन निघाले होते. या सर्व १३ जणांच्या कुटूंबियांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. हे सर्व जण अमरावती येथे परस्परांच्या संपर्कात आले होते.
अधिक वाचा : वाशिममध्ये कोरोना पॉझीटीव्ह, तबलिगी जमातीच्या संमेलनात हजेरीची शक्यता
दरम्यान वाडेगाव ता बाळापूर येथील १८ जणांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर उर्वरित नऊ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. अहवाल निगेटीव्ह आलेल्या ९ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर अहवाल प्रलंबित असणारे अद्याप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत., अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आता प्रत्यक्ष पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती आढळत असल्याने नागरिकांनी आता तरी गांभिर्याने अधिक खबरदारी घ्यावी. घरात रहावे. बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.