अकोला- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तांदुळ वितरणास प्रारंभ झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात तीन महिन्याचे धान्य एकत्र वाटप करावे अशा सुचना होत्या मात्र आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तांदुळ उपलब्ध करुन दिल्याने एप्रिल महिन्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत दिलेल्या अन्नधान्याचे त्या त्या महिन्यात वाटप होणार आहे. थोडक्यात एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तांदळाचे वाटप हे ई- पॉस मशिनद्वारे व मोफत होणार आहे. मात्र ह्या तांदळाचे वाटप करतांना लाभार्थ्यांनी त्या महिन्याच्या नियमित अन्नधान्याची उचल केल्याची खातरजमा केली जाईल. दुकानदाराने पावती सांभाळून ठेवावी, लाभार्थ्यांना पावती देऊ नये, तसेच लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांकही लिहून ठेवावे.
अंत्योदय योजनेतील कुटूंबातील सदस्यांना प्रतिमाह प्रतिसदस्य किलो या प्रमाणे तांदुळ वितरीत केला जाईल. म्हणजेच अंत्योदय अन्न योजना कुटुंब लाभार्थ्यांना या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या नियमित ३५ किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर शिधापत्रिकेवर एक सदस्य असल्यास पाच किलो, दोन सदस्य असल्यास १० किलो याप्रमाणे तांदुळाचे मोफत वितरण करण्यात आले. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यां अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय पाच किलो प्रति सदस्य प्रमाणात तांदळाचे वितरण केल्यानंतर प्रति सदस्य पाच किलो तांदुळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. हे सर्व वितरण इ-पॉसद्वारे वाटप करण्यात येईल. एप्रिल महिन्यासाठीचे तांदळाचे नियतन शासकीय गोदामातून प्राप्त करुन घेण्यात येत आहे. हा तांदुळ प्राप्त झाल्यावर त्वरीत दुकानदार मोफत तांदुळाचे वाटप करतील. मे व जून महिन्याचे नियतन व अतिरिक्त मोफत तांदुळही स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध होईल,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.