नवी दिल्ली : संपूर्ण देशात दिल्लीत झालेल्या निजामुद्दीनमधील तबलिगी परिषदेमुळे खळबळ माजली आहे. देशातील विविध राज्यातील आणि परदेशातील लोक या परिषदेत सामिल झाले होते. याबाबत गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तब्बल 9 हजार लोकांना या परिषदेमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. किमान 7 हजार 600 भारतीय आणि 1 हजार 300 परदेशी लोक या परिषदेस उपस्थित होते असा अंदाज वर्तवला जात आहे.
गेल्या महिन्यात जमातने दिल्लीच्या निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम आता भारतातील कोरोना व्हायरसचे प्रमुख केंद्र झाले आहे. अद्याप तबलिगी जमातमधील सदस्यांची ओळख सुरू झाल्यामुळे सदस्यांची संख्याही वाढू शकते. देशभरातील अन्य जमात देशातील 1 हजार 306 सदस्यांची ओळख पटली आहे. गृहमंत्रालयाने एकत्रित केलेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपर्यंत 1 हजार 051 लोकांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
तबलिगी जमातमधील 7 हजार 688 कार्यकर्त्यांची ओळख पटवली जात आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील सर्वात जास्त 190, आंध्र प्रदेशातील 71, दिल्लीत 53, तेलंगणामध्ये 28, आसाम 13, महाराष्ट्रातील 12, अंदमानमध्ये 10, जम्मू-काश्मीर 6, गुजरात आणि पुडुचेरीमधील प्रत्येकी एकाचा शोध घेण्यात आला आहे.