तेल्हारा (विलास बेलाडकर)- मौजे शेरी येथे कृषी विभागाच्या वतीने जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून हरभरा शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.शेती शाळेला मंडळ कृषी अधिकारी उमेश कदम यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना उमेश कदम यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून मातीचे महत्त्व विशद केले.शेतकऱ्यांनी टाकलेले बी रुजवण्यासाठी माती हा घटक सर्वात महत्वाचा आहे.खडकापासून माती तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात.ती माती विविध जिवाणूंच्या अस्तित्वमुळे जिवंत आहे. तिचा जिवंतपणा टिकवण्यासाठी शेंद्रिय शेतीकडे शेतकरी बांधवांनी वळावे. अश्या अमूल्य ठेवा असलेल्या मातीचे संधारण करण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढे त्यांनी बियाणे प्रक्रियेवर बोलताना,बिया मधून अंतर्गत प्रक्रियेने कोंब बाहेर येतो,बाहेर आल्यानंतर त्याच्या पोषणाची आणि किडीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी ही शेतकऱ्यांनी जैविक जिवाणूची व ट्रायको डेर्मा ची बीज प्रक्रिया करून पार पाडवी असे सांगितले.
शेती शाळेत कृषी सहाय्यक एस डी निचळ यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शेती शाळेला गावचे सरपंच श्री सपकाळ,प्रगतशील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक एस डी नीचळ यांनी केले.