अकोला- मराठी पत्रकार परिषदेचा ८१ वा वर्धापन दिन 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.. हा दिवस महाराष्ट्रील पत्रकार “विजय दिवस” म्हणून साजरा करणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली आहे.मराठी पत्रकार परिषदेने वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी वेळोवेळी मोठा संघर्ष केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात बिहार सरकारने आणलेल्या काळ्या विधेयकाच्या विरोधात देशात सर्वात प़थम मराठी पत्रकार परिषदेने आवाज उठविला. त्यासाठी ८१ पत्रकारांनी तुरूंगवास भोगला. त्यानंतर जेव्हा जेव्हा माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा मराठी पत्रकार परिषदेने त्याविरोधात लढा दिला. पत्रकारांच्या हक्कासाठी देखील परिषद कायम संघर्ष करीत आली आहे. सरकारने सुरू केलेली आरोग्य योजना, छोटया वृत्तपत्रांसाठीचे नवे जाहिरात धोरण पत्रकार पेन्शन योजना, आणि पत्रकार संरक्षण कायदा ही अलिकडची काही उदाहरणं आहेत. मजिठियाच्या अंमलबजावणीसाठी फक्त मराठी पत्रकार परिषद आणि बीयुजे या दोनच पत्रकार संघटना आग्रही असल्याचे दिसते आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे.. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे. हे परिषदेमुळे शक्य झाले आहे. याचा परिषदेच्या तमाम सदस्यांना सार्थ अभिमान आहे. परिषदेच्या पुढाकाराने लढलेल्या लढयामुळेच विजय प्राप्त झाला असल्याने परिषदेचा वर्धापन दिन विजय दिवस म्हणून साजरा करणे विशेष औचित्याचे ठरणार आहे.विजय दिवसाच्या निमित्तानं ठिकठिकाणी दरवर्षी प़माणे पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं तर होतीलच त्याचबरोबर रक्तदान शिबिरांचे आयोजन करून पत्रकार परिषद आपल्या सामाजिक बांधिलकीचं दर्शन जनतेला घडवेल. रूग्णांना फळाचे वाटपही केले जातील. फटाके फोडून पत्रकार कायदा झालयाबददलचा आपला आनंद व्यक्त करतील. तसेच गॅझेट मध्ये प़सिध्द झालेल्या कायद्याची प़त जिल्हा पोलीस प्रमुख तसेच तालुका पोलीस ठाण्यात दिल्या जातील. विजय दिनाच्या निमित्तानं तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रत्येकी किमान पाच ज्येष्ठ आणि वयोवृद्ध पत्रकारांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात येईल.
महाराष्ट्रातील परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा संघांनी विजय दिवसाचा हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, उपाध्यक्ष राजेंद्र काळे सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी केले आहे.