अकोला (प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्याला एक नवी ओळख मिळाली असून राज्यात प्रदूषित शहर म्हणून अकोला शहरावर ठपका लागला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची देशातील सर्वात प्रदूषित शहरांची यादी प्रकाशित होऊन वर्ष झाले. नंतर ‘शुध्द हवा संकल्प मिशन २०२२’ यामध्ये अकोला शहराचा राज्यात सर्वात प्रदूषित दुसरे शहर म्हणून ओळख अधोरेखित झाली. मात्र, एक-दोन ऑक्सिजन पार्कशिवाय आतापर्यंत कूठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे विदारक चित्र आहे.
शहरातील विविध भागात रस्ता दुरूस्ती व निर्मितीचे बऱ्याच दिवसापासून असल्याने प्रदूषणात आणखी वाढ होत आहे. त्याच बरोबर वाहनांमधून सोडले जाणारे कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स, नायट्रोजन ऑक्साइड या घटकांमुळे प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे.
धुलीकणांचा सामना करण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावले तरी त्यातूनही आरपार जाऊन शरीरात प्रवेश करण्याची क्षमता त्यात असल्याने ही समस्या भविष्यात मोठे भयानक स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच खराब रस्ते आणि इंधनाचे ज्वलन त्यासोबतच धूलिकणांच्या प्रदूषणानामुळे अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे चित्र आहे.एवढ्या मोठ्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे असून लोकप्रतिनिधी नि उपाययोजना करणे गरजेचे झाले असून अकोल्याला लागलेला डाक पुसून काढण्याची गरज आहे.









