अकोला : विधानसभा २०१९ निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे. पण अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर मतदारसंघात तर कहर झाला आहे. या मतदारसंघात तब्बल ७ तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत. अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघातून २०१४ साली प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाकडून केवळ एक आमदार निवडून आला होता. बळीराम शिरस्कार या मतदारसंघातून विजयी झाले होते.
मात्र आता वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली लढत असलेल्या या पक्षानं डॉ. धैर्यवान पुंडकर यांना तिकिट दिलं आहे, त्यामुळे वंचितचे विद्यमान आमदार शिरस्कार यांनी बंडखोरी करत इथून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
जागावाटपावरून वंचितसोबत फाटल्यानंतर एमआयएमनं रहेमान खान यांना बाळापुरातून तिकीट दिलं आहे. तर युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. या पक्षानं नितीन देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. मात्र यामुळे भाजपा नेते नारायण गव्हाणकर नाराज झालेत आणि त्यांनी बंडखोरी करत अर्ज भरला आहे. युतीमधल्याच शिवसंग्राम पक्षाचे संदीप पाटील यांनीही बंडाचा झेंडा उभारला आहे.
आघाडीकडून राष्ट्रवादीचे संग्राम गावंडे हे सातवे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे डॉ. पुंडकर, शिरस्कार, रहेमान खान, नितीन देशमुख, नारायण गव्हाणकर, संदीप पाटील आणि संग्राम गावंडे असे तब्बल सात जण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
सोमवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. यापैकी कुणी माघार घेतली नाही, तर बाळापुरात सत्ते पे सत्ताचा प्रयोग रंगण्याची चिन्हं आहेत. यात कोण बाजी मारेल याचा अंदाज बांधणं आजतरी कठीण आहे.