अकोला (प्रतिनिधी): प्रत्येकी १२५ मतदारसंघ असे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटप ठरले असले तरी कोणता मतदारसंघ कोणाला सुटला, याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही, त्यामुळे या दोन्ही पक्षांतील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे ज्या पक्षाला मतदारसंघ सुटला आहे त्या पक्षाकडे प्रभावी उमेदवाराचा अभाव असल्यास आपल्याच मित्रपक्षातील नेत्याला जाळ्यात ओढण्याचेही प्रकार सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तृळात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेसने गेल्या वेळी स्वबळावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला दुसºया स्थानावर समाधानी राहावे लागले तर काँग्रेसला तिसरा किंवा चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता १२५ जागांचा फॉर्म्युला ठरविताना २००९ मध्ये कोणते मतदारसंघ कोणाकडे होते, यासोबत २०१४ च्या निवडणुकीत प्रत्येक पक्षांची त्या मतदारसंघात कशी कामगिरी होती, याचीही चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे २००९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे असलेल्या मतदारसंघापैकी काही मतदारसंघात खांदेपालट झाल्याची शंका आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या विधानसभेच्या निवडणुक महासंग्रामचा मागोवा
नेमके कोणते मतदारसंघ त्याच पक्षाकडे कायम राहिले अन् कोणते बदलले यावर अधिकृतरीत्या माहिती बाहेर आलेली नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला आहे. काहींना आतील सूत्रांकडून मतदारसंघात बदल झाल्याची माहिती मिळाल्यामुळे ज्यांच्या हिरमोड झाला अशांना मित्रपक्षच जाळ्यात ओढत असल्याचे चित्र आहे, तर काही इच्छुक इतर पर्यायांची चाचपणी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अकोला पश्चिमचा गुंता कायमच! अकोला पश्चिम हा मतदारसंघ मुस्लीमबहुल मतदारसंघ असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांची नावे सध्या अग्रस्थानी आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावे चर्चेत असून, पक्षातील घडमोडीकडे नेत्यांचे बारीक लक्ष आहे; मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच कायम ठेवण्यात आल्याच्याही चर्चा सध्या जोरात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दावेदारांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. बाळापूर मतदारसंघ कळीचा मुद्दा बाळापूर मतदारसंघांसाठी काँग्रेस आघाडीत प्रचंड स्पर्धा रंगली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला घेऊन अकोला पश्चिम मतदारसंघ काँग्रेसला देण्यात यावा, असा प्रस्ताव आघाडीत चर्चेला आला आहे. या चर्चेचा निर्णय काय झाला, याबाबत दोन्ही काँग्रेसचे नेते संभ्रमित आहेत. काँग्रेसकडून प्रकाश तायडे, एनोकोद्दीन खतीब, डॉ. सुधीर ढोणे तर राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नावांची चर्चा आहे.