तेल्हारा (प्रतिनिधी)- येथील दुरसचार विभागाचा कारभार सध्या बेतालपणे सुरू असुन या कार्यालयात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी दुरसचार विभागाची लाईन नादुरुस्त असुन ती दुरुस्ती केली जात नसल्याने येथील बँकांसह विविध शासकीय कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले आहेत. याबाबत दुरसचार विभागाकडे तक्रार करुन देखील कोणताही फायदा होत नसल्याची सर्वत्र ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे बँक अधिकारी खातेदार त्रस्त झाले आहेत.
तेल्हारा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी विविध बँकांच्या शाखा आहेत शिवाय विविध शासकीय कार्यालय देखील असुन बहुतेक ठिकाणी दुरसचार विभागाची सेवा आहे, असे असले तरी ती सेवा देण्यास येथील अधिकारी कर्मचारी यांना पुर्णता अपयश आल्याचे एकंदरीत सुरु असलेल्या प्रकारावरुन दिसुन येत आहे. येथील निशांत मल्टिस्टेट को. आप. केडीट सोसायटी, शाखा तेल्हारा, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जनता बँक, इंदिरा गांधी सहकारी संस्था यासह सर्वच बँका पतसंस्थाचे व्यवहार ठप्प झाले असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे येथील दुरसचार विभागाच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केल्या जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू असुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देवून देखील नादुरुस्त लाईन दुरुस्ती करण्यात येत नाही. पावसाळ्यात काम केल्या जात नाही पावसाळ्यानंतर ही कामे करण्यात येतील, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. मग पावसाळा बंद होईपर्यंत काम होणार नाही काय, त्यामुळे व्यवहार कसे काय करायचे असा प्रश्न खातेदार बँक अधिकारी यांच्या कडून केल्या जात आहे. दुसरीकडे दुरसचार विभागाचे दरमहा येणारे बिल भरण्यास विलंब झाला तर लगेच पुरवठा खंडित केल्या जाते तर दुसरीकडे सेवा मात्र दिली जात नाही याबाबत दुरसचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.