मुंबई (प्रतिनिधी)- भाजप-शिवसेनेच्या जागावाटपात अजून एकमत झाले नसले तरी दाेन्ही पक्षांतील नेते युतीच्या निर्णयावर ठामच आहेत. २०१४ मध्ये भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले असले तरी उपमुख्यमंत्रिपदासह महत्त्वाच्या मंत्रिपदापासून दूरच ठेवले हाेते. या वेळी मात्र दोन्ही पक्षांना समसमान कार्यकाळ म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद व उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात येईल. १९९० च्या जागावाटपानुसार हा फाॅर्म्युला असेल अशी महिती आहे
युतीच्या जागावाटप चर्चेसाठी भाजपतर्फे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेतर्फे सुभाष देसाई व इतर नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये जागावाटपाचा आराखडा तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार आहेत. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यमान आमदारांच्या बहुतांश जागा कायम राहतील. त्यापैकी काही मतदारसंघांची मात्र अदलाबदल केली जाऊ शकते