अकोला (प्रतिनिधी)- तेल्हारा पोलीस हद्दीत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एका ९ वर्षीय बलिकेचे अपहरण करण्यात आले होते. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा अपहरण कर्ता आरोपी अद्याप मोकाट असून तेल्हारा पोलीस त्याचा शोध घेण्यास असमर्थ ठरत आहेत.
दि. १४ ऑगस्ट च्या सायंकाळी तेल्हारा शहरातील साई बाबा मंदिर परिसरात वास्तव्यात असलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीचे स्थानिक कृषी उत्पन्न समिती मार्केड यार्ड समोरून दुचाकीस्वार अपहरण कर्त्याने अपहरण करून तालुक्यातील पाथर्डी येथील नदी किनारी नेले होते. मात्र सदर ९ वर्षीय बलिकेने अपहरण कर्त्याच्या तावडीतून आपली सुटका करून तेथून पळ काढला. रस्त्याने ये जा करणाऱ्या काही वाहनधारक यांना सदर बालिका दिसल्याने तिला विचारपूस केली असता तिचे अपहरण झाल्याची बाब लक्षात आल्याने तेल्हारा पोलिसांना याबाबत पाथर्डी येथील नागरिकांनी अवगत करून सदर बलिकेला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
त्यानंतर तेल्हारा पोलिसांनी अज्ञात अपहरण कर्त्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तेल्हारा पोलिसांनी शहरातील सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले असता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॅमेरा मध्ये अपहरण करतांना चे सी सी टी व्ही फुटेज हाती लागले होते. सदर ५० ते ५५ वर्षीय अपहरण कर्ता हा हिरो होंडा कम्पणीची डबल एस सी डी १०० ही गाडी घेऊन सदर बलिकेचे अपहरण करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तेल्हारा पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असता आज आठ दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा अपहरण कर्त्या आरोपीचा शोध न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जात आहे.
नव्यानेच रुजू झालेले अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून अपहरण कर्ता आरोपीचा शोध घेऊन सदर ९ वर्षीय चिमुकलीला न्याय द्यावा जेणेकरून पोलिसांप्रति नागरिकांचा विश्वास कायम राहणार.
गरीब कुटुंबातील चिमुकली असल्या कारणाने पोलीस हे प्रकरण पाहिजे त्या पद्धतीने हाताळत नसल्याची चर्चा शहरात सुरू असून एवढे गंभीर स्वरूपाचे प्रकरण घडून सुद्धा पोलिसांना याबाबत काही घेणे देणे आहे की नाही असा आरोप सुद्धा काही सुद्न्य नागरिक करीत आहेत. जर आरोपीचे चित्र व मोटारसायकल याचे वर्णन पोलिसांकडे असून सुद्धा पोलीस शोध घेण्यास का असमर्थ ठरत आहे आहेत हा प्रश्न सुद्धा नागरिकांना पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तेल्हारा पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात असून आरोपीचा अद्याप शोध न लागल्याने तेल्हारा पोलिसांवर टिकेची झोड दिसून येत आहे.