कोल्हापूर – सांगलीमध्ये महापूराने हाहाकार उडाला आहे. दरम्यान पूरग्रस्त कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळाच्या पाकिटांवर आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो लावल्यामुळे पुन्हा एकदा भाजपवर टीका केली जात आहे. शासनाच्या मदतीच्या पाकिटांवर स्वतःचा फोटो लावण्याच्या प्रकारावर विरोधकांनी जोरदार टीका केली.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. जी मदत देताय ती तुमच्या बापाच्या घरातून देताय का? सरकार जी मदत करतंय ते काही उपकार करत नाही. या पाकिटांवर फोटो लावत आहेत, आता कमळ तेवढं लावायचं राहिलं आहे. पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळू नका”, पूरग्रस्तांना मदत द्यायची असेल तर स्वत:च्या खिशातली द्या आणि त्यावर तुमचे फोटो चिटकवा. अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.