अकोट (सारंग कराळे)- भारतीय जनता पक्षाशी आमची एकनिष्ठता आहे, ती कोणीही कमी करू शकत नाही. पक्षाकडे उमेदवारी मागणे गैर नाही, पक्षाने कार्यकर्तोना अधिकार दिला आहे. त्यामुळे अकोट मतदारसंघात बाहेरच्यांना सतत उमेदवारी दिल्यास मायच प्रेम मावशीत येत नाही, असा अनुभव पाहता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून अकोट विधानसभा मतदार संघातील जन्माने आणि कर्माने स्थानिक आहे, त्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार एकमुख मागणीचा ठाम निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.
अकोट मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, या मागणी करीता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शूक्रवारी दुपारी पार पडली. या बैठकीतील स्वरूप आता आमदार प्रकाश भारसाकळे यांना पार्सल उमेदवार म्हणून मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध असल्याचे दिसून आले आहे खुद भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक उमेदवाराची मागणी लावून धरल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हक्काचा माणूस म्हणून स्थानिक उमेदवारांची मागणी ला जोरदार समर्थन मिळत आहे. या बैठकीत अनेकांनी विचार मांडताना, भाजपाचा कार्यकर्ते काहीच मागत नाही, पक्षाने दिलेला उमेदवार निवडुन देतो. भाजपात कार्यकर्तेच मोठा आहे असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. पण पक्षाने अकोट मतदारसंघात दीलेल्या आमदाराने काहीच केल नाही. स्थानिक उमेदवार असलातर आपुलकी प्रेम राहते,आपण हक्काने बोलु शकतो. भाजपा शासन खुप निधी देते पण इच्छाशक्ती पाहीजे. ती इच्छाशक्ती बाहेरच्या उमेदवारांत नसल्याने अद्यापही रस्त्यासह मूलभूत सूविधा नाही. सध्या आकडेवारी चा विकास आहे. पण विकास दिसत नाही. समाज सूधारावा समाजाची बांधणी होईल अस काम झाल नाही.
पैसे खाणे हा विषय नाही. शेवटी खाली हाताने जावे लागते हे लक्षात ठेवा. अकोट मतदारसंघात भाजपाकडे एकही उमेदवार नाही अस षंडयत्र पक्षाकडे रचविले जात आहे. कोणालाही उमेदवारी द्या, पुष्कळ उमेदवार आहेत जे निवडून येऊ शकतात. पक्षाने संधी द्यावी शेवटी निवडुन आणणारे आपणच स्थानिक कार्यकर्ते आहोत. कार्यकर्तामध्ये आमदार होण्याची लायकी नसावी काय, शेवटी स्वाभिमान असला पाहीजे. हिनदर्जाची वागणुक भेटत असतांना, अपमान का सहन करावा. पक्षाचे काम करू पण पक्षाने स्थानिक उमेदवार द्या. कोणत्याही समाजाचा जातीचा असो अकोट, तेल्हारा तालुक्यातील असो चालेल. श्रीमंत लोक आमदार होण्यासाठी अकोट मतदारसंघावर डोळा ठेवतात. स्थानिक जनतेला भिकारचोट समजतात. यावेळेस भाजपाची उमेदवारी प्रकाश भारसाकळे यांना आहे, हे कशावरून म्हणता येईल. परिस्थिती बदलली आहे. विकास काम नाही झाल तर जनता टोमणे मारते, अशा प्रकारे अनेकानी आपले विचार मांडले. बैठकीला मोठ्या प्रमाणात अकोट, तेल्हारा तालुक्यातील भाजपाचे आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.
चौकट..
अकोट विधानसभा मतदार संघातील सर्व आजी माजी भाजपा पदाधिकारी, बुधप्रमुख, कार्यकर्ता यांच्या बैठकीत उपस्थिततांच्या सह्यानिशी निवेदन तयार केले. सदर निवेदन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्याचे ठरले. मतदार संघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचे स्थानिक उमेदवारी बद्दल समर्थन मिळत असल्याने गावागावात बैठक घेऊन पक्षश्रेष्ठींना आढावा सादर करण्यात येणार आहे. या निवेदनात अकोट विधानसभा मतदार संघात अकोट व तेल्हारा तालुका असा हा संयुका मतदार संघ असून जनसंघ जनता पार्टी, भारतीय जनता पक्षाचे काम करणारे निष्ठावंत असे शेकडो कार्यकर्ते पक्षामध्ये असुन प्रत्येक निवडणूकीमध्ये या कार्यकर्त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे . नगरपालीका-विधानसभा, लोकसभा तथा स्थानिक स्वराज्य संस्था से पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीत पक्षाला विजश्री प्राप्त करून देण्याकरिता जीवाचे रान केले आहे.
भाजपाचे दिवंगत नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर जेव्हा-जेव्हा लोकसभा निवडणुक लढले तेव्हा त्यांना या मतदार
संघातुन मोठी आघाडी कार्यकर्त्याच्या माध्यमातुन मिळाली आहे. तसेच मागील तिन टर्मपासून अकोला लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले खासदार संजय धोत्रे यांना सुध्दा प्रत्येक निवडणुकीमध्ये या मतदार संघातून मोठी आघाडी या मतदार संघाने दिली आहे. अशातच मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व
शिवसेनेची युती तुटली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतृत्वाने अकोट विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा पदाधिकरी कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता अमरावती जिल्हयातील शिवसेना, काँग्रेस, अपक्ष असा प्रवास करीत भाजपामध्ये दाखल झालेल्या प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी दिली. अशाही वेळी स्थानिक भाजपा कार्यकत्यांनी कुठलीही नाराजी न दाखविता एकदिलाने काम करुन प्रकाश भारसाकळे यांना भरघोष मतांनी विजयी केले. पंरतु निवडून आलेल्या आमदार यांची स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याविषयी वागणुक योग्य नसून जेष्ठ कार्यकर्त्यांचा मानसन्मा करीत नसल्याचे सर्वश्रुत आहे. आमदारांची वागणुक योग्य नसुन गत पाच वर्षाच्या काळात सुध्या त्यांची नाळ या मतदार संघात रुजलीच नाही त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना आपल्यावर अन्याय होत असल्याचे जाणवत आहे. स्थानिक कार्यकर्त्यावर अन्याय न होऊ देता कोणत्याही जाती-धर्माच्या कार्यकर्त्याला अकोट मतदारसंघाची उमेदवारी दिल्यास एक दिलाने काम करून त्याला निवडून आणू अशांची मागणी करण्यात आली आहे
सर्व घरातच पाहीजे तर कार्यकर्त्यांनी काय करावे?
आमदार प्रकाश भारसाकळे हे त्यांच्या दर्यापुर शहरात घरातले नगराध्यक्ष बनवितात. दुसरे अकोट मतदारसंघात जाऊन आमदार होतात. सर्व घरात पाहीजे. तर मग कार्यकत्याँनी काय करावे. पार्सलीच निवडून द्यायचे काय. भारसाकळे यांना पाच वर्ष संधी दिली त्यांनी आभार मानावे आणि कार्यकर्ते संधी देण्यासाठी पुढाकार द्यायला पाहिजे, असाही सुर बैठकीत उमटला. अकोटात कोणालाही उमेदवारी द्या पण स्थानिक कार्यकर्ते सन्मान झाला पाहीजे. विकासपुरूष वैगरे काही नसते, शेवटी जनताच सत्तेवर आणते आणि रस्तापण दाखवते. आमची स्थानिकाला उमेदवारी द्या हा गटबाजीचा प्रकार नाही. आमची पक्षनिष्ठा कायम आहे, मुद्दा फक्त स्थानिक उमेदवार देण्याची आग्रही विचार मांडण्यात आले.
अधिक वाचा: ब्रेकिंग- तेल्हारा तालुक्यातील दोन युवक पुराच्या पाण्यात वाहून गेले