कोलकाता : कोलकातामधील हुगली नदीत बुडून ४१ वर्षीय जादूगार बेपत्ता झाला आहे. कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून हुगली नदीत उतरलेला जादूगार पाण्यात बुडाला असल्याची भीती व्यक्त होत असून त्यांचा शोध सुरु आहे. चंचल लाहिरी असं या जादुगाराचं नाव असून जादूगार मँड्रेक नावाने ते प्रसिद्ध आहेत. नातेवाईक, मीडिया, पोलीस आणि अनेक लोकांच्या उपस्थितीत क्रेनच्या सहाय्याने ते नदीत उतरले होते. पण बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने शोध सुरु कऱण्यात आला. अद्यापही शोध सुरु असल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे
चंचल लाहिरी यांना यावेळी नशिबाने साथ दिली नाही असं वाटत आहे. सहा वर्षांपुर्वी २०१३ मध्येही त्यांनी हा स्टंट केला होता. त्यावेळी त्यांना उपस्थितांनी हुल्लडबाजी करत बराच त्रास दिला होता. आपण या जादूची ट्रिक पाहिली असल्याने फसवणूक झाल्याचा दावा उपस्थितांनी केला होता.
स्टंट सुरु होण्याआधी बोलताना चंचल लाहिरी यांनी २१ वर्षांपुर्वी याच ठिकाणी आपण असाच स्टंट केला होता असा दावा केला होता. ‘मी एका बुलेटप्रूफ ग्लास बॉक्सच्या आतमध्ये होते. आपले हात आणि पाय साखळीने बांधण्यात आले होते. हावडा ब्रीजवरुन आपल्याला खाली उतरवण्यात आलं होतं. २९ सेकंदात पाण्याबाहेर येत आपण स्टंट पूर्ण केला होता’, असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. मात्र यावेळी स्टंट करणं कठीण असू शकतं अशी कबुली त्यांनी दिली होती. ‘जर मी हे खोलू शकलो तर जादू, पण जर नाही करु शकलो तर शोकांतिका’, असंही ते म्हणाले होते.
स्टंट सुरु झाल्यानंतर बराच वेळ होऊनही चंचल लाहिरी बाहेर आले नाहीत तेव्हा गोंधळ उडण्यास सुरुवात झाली. काही लोकांनी आपण नदीच्या मध्यभागी एका व्यक्तीला मदतीसाठी झगडत असल्याचं पाहिलं असल्याचा दावा केला आहे. पोलिसांना माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधमोहिम सुरु करण्यात आली. पण अद्याप पत्ता लागलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चंचल लाहिरी यांनी कोलकाता पोलीस आणि कोलकाता पोर्ट ट्रस्टकडून स्टंट करण्यासाठी परवानगी घेतली होती. यावेळी त्यांनी हा स्टंट बोट किंवा मोठ्या जहाजावर केला जाईल आणि त्याचा पाण्याशी काही संबध नसेल असं स्पष्ट केलं होतं. यामुळेच आम्ही परवानगी दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या अजून एका स्टंटचा उल्लेख केला नव्हता. आम्ही त्याचा तपास करत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
अधिक वाचा : नक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे ?
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1