पुणे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या “विजय संकल्प रॅली‘मध्ये सहभाग घेताना वाहतुकिचे नियम पायदळी तुडविणाऱ्या भाजप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे वाहतूक शाखेची नुकतीच जबाबदारी स्वीकारलेले पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
“पक्ष कोणताही असो, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असेल, हेल्मेट परिधान केले नसेल, तर संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जाईल’ असे देशमुख सांगत आपल्या पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली.
उस्मानाबाद पाठोपाठ, सातारा येथे पोलिस अधिक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या देशमुख यांची मागील आठवड्यात पुण्यात पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली. तर साताऱ्याच्या पोलिस अधिक्षकपदी पुण्यातील वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाली. दरम्यान, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडून कायम प्राधान्य दिल्या जाणाऱ्या वाहतूक शाखेची जबाबदारी सातपुते यांच्यानंतर देशमुख यांच्या खांद्यावर देण्यात आली. देशमुख यांनी शुक्रवारी आपल्या कामाची सुत्रे हाती घेऊन कामाला सुरवात केली.
हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचा विजय साजरा करण्यासाठी शहरातील आठही मतदारसंघांमध्ये भाजपने दुचाकी रॅली काढली होती. हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या दुचाकी रॅलीमधील बहुतांश कार्यकर्त्यांनी हेल्मेटचा वापरच केला नव्हता. त्याचबरोबर रॅलीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघनही केल्यामुळे “आता त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार का,’ असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांकडून उपस्थित केला जात होता.
दरम्यान, देशमुख यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपच्या दुचाकी रॅलीमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतुक पोलिस कारवाई करणार काय, असा प्रश्न देशमुख यांना पत्रकारांनी विचारला. त्यावेळी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता, “वाहतुकीचे नियम सर्वांना सारखे आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची सीसीटीव्हीद्वारे पाहणी करुन पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. रविवारच्या दुचाकी रॅलीमध्ये जर वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच त्यांच्यावरही कारवाई होईल.’ असे स्पष्ट केले.
दरम्यान, शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकासकामे सध्या जलदगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. पोलिसांकडील मनुष्यबळही कमी आहे. मात्र पुणेकरांनीच स्वतः वाहतुकीची शिस्त पाळल्यास पोलिसांवरील ताण कमी होईल. तरीही पुणेकरांना सुरळित व सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील राहतील. पादचाऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल, त्याचबरोबर वाढते अपघात थांबविण्यासाठी महापालिकेसह अन्य संस्थांशी समन्वय ठेवून ठोस उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा : भाजप सरकारच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत- नितीन गडकरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1