मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS-2) 2016-17 नुसार देशभरात महाराष्ट्रमध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणानुसार धूम्रपान करण्याचे प्रमाण 3.8 इतके असून ते अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात धूम्रपान 2.1 टक्क्याने आणि धूम्रविरहित तंबाखू सेवनात 3.1 टक्क्याने घट झाल्याचे आढळून आले आहे. ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियानांतर्गत 2 हजार 755 शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यात तंबाखू सेवनाच्या प्रमाणात सन 2005-06 ते 2015-16 मध्ये घट आढळून आली आहे. सन 2005-06 मध्ये स्त्रियांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 10.5 होते ते आता 5.8 टक्के तर सन 2005-06 मध्ये पुरुषांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण 48.3 टक्क्यांवरुन 36.6 टक्क्यांवर आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर 309 तंबाखू मुक्ती केंद्राची स्थापना केली आहे. त्यामार्फत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती तसेच समुपदेशन जिल्हा व तालुकास्तरावर केले जात आहे. डिसेंबर 2018 अखेर 1 लाख 42 हजार जणांचे समुपदेशन करण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 324 लोकांनी तंबाखू सेवन बंद केले आहे. राज्य शासन, सलाम मुंबई फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांबरोबर जिल्हा, तालुका व गावपातळीवर ‘तंबाखू मुक्त शाळा’ हे अभियान राबवत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 2 हजार 755 शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत.
सर्व आरोग्य संस्था व कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून आतापर्यंत एकूण 804 आरोग्य संस्था तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. ‘कोटपा’ कायद्यांतर्गत विविध कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करुन डिसेंबर 2018 अखेर राज्यात 15 लाख 39 हजार 174 रुपये एवढा दंड वसूल केला आहे.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीरित्या राबविण्यासाठी आरोग्य विभागाला संबंध हेल्थ फाऊंडेशन, सलाम बॉम्बे फाऊंडेशन, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आदी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. राज्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे काम चांगले सुरु असून गॅट्स-2 च्या सर्वेक्षणामध्ये त्याचा प्रभाव दिसून येत आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
अधिक वाचा : युवासेने कडून जिजाऊ जयंती सोहळा साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola