अकोला (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहन व्यवस्था याचे नियोजन योग्य पद्धतीने केले जावे. तसेच सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी. ज्या मतदार केंद्रांवर दूरध्वनी अथवा मोबाईल कनेक्टीव्हिटी नाही, अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी संबंधित सर्व सर्व्हिस प्रोव्हायडरची बैठक घेवून चर्चा करावी. तसेच मतदानाबाबत जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, प्रा. संजय खडसे, निलेश अपार, अभयसिंह मोहिते आदींसह निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.
श्री. सिंह म्हणाले की, मतदार यादीनुसार जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात स्त्री-पुरुष मतदारांचे गुणोत्तर हे जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत कमी आहे, अशा ठिकाणी स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पात्र महिला मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करावी. महिला मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासोबतच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदान ओळखपत्र व मतदार यादीमध्ये ज्यांची छायाचित्रे नाहीत, ती प्राप्त करून घेण्यासाठी व नवमतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनविषयी जिल्ह्यात सुरु असलेल्या जनजागृती मोहिमेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके तयार करणे, जिल्हा संपर्क कक्ष, कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रांवर उपलब्ध असलेल्या सुविधा आदी विषयांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
अधिक वाचा : मैत्रेय वाचनालयात महात्मा गांधी स्मृतिदिन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola