अकोला (प्रतिनिधी): जागा नावाने करून देत नाही, या क्षुल्लक कारणावरून पोटचा मुलगा विठ्ठलने लाथा-बुक्क्यांनी व काठीने ७० वर्षीय बापाला बेदम मारले. जीवाच्या आकांताने बाप मुलासमोर दयेची भीक मागत होता…’विठ्ठल पोरा मारू नको..मारू नको..अन् सुनेच्या पाया पडून बाई मारू नको ..मारू नको..’ असे म्हणत होता; पण ना मुलाला पाझर फुटला ना सुनेला.. अखेर करंट्या विठ्ठलने बापाचा मुडदा पाडला आणि गोठ्यात चारा टाकण्यासाठी गेले असता गाईने व गोऱ्याने मारले म्हणून पोलिसांत खोटा रिपोर्ट दिला. मात्र कानून के हाथ लंबे होते है..या म्हणी प्रमाणे पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास केला आणि हत्याकांड उघडकीस आणले. मुलगा विठ्ठल विरुद्ध शुक्रवारी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलाने बापाच्या हत्येची कबुली दिली आहे. ही घटना बाळापूर तालुक्यातील देगाव येथील आहे.
गंगाधर म्हैसने असे मृत्यूमुखी पडलेल्या दुर्देवी पित्याचे नाव आहे. मुलाचे नाव विठ्ठल ठेवण्यापूर्वी त्यांनी विचार केलाच असेल.. धार्मिक वृत्तीच्या गंगाधर यांनी मुलाचे विठ्ठल नाव ठेवण्यापूर्वी कितीतरी स्वप्ने रंगवली असतीलच. मात्र हाच विठ्ठल म्हातारपणात आपला जीव घेईल, असा विचारही त्यांनी केला नसेल. मात्र संपत्तीच्या लालसेपोटी त्याने वडिलांचा खून केला. २२ डिसेंबर रोजी वडिल घरात असताना जागा नावाची का करून देत नाही म्हणून वडिलांशी वाद घातला. त्या वादाला खतपाणी विठ्ठलच्या भावजयीने घातले. रात्री ८ वाजताच्या सुमारास दोघांनी वडिलांच्या वयाचा कोणताही विचार न करता मारहाण केली. दोघेही लाथाबुक्क्या व काठीने मारहाण करीत असल्याने गंगाधर यांच्या किंकाळ्या अनेकांनी ऐकल्या. त्यातच एकाने त्यांच्या घरी जावून पाहिले असता विठ्ठलने दार बंद करून काहीच झाले नाही, असे दर्शवले व थोड्या वेळ्याने वडिल गोठ्यात गाईला व गोऱ्याला चारा घालण्यासाठी गेले असता त्यांना गाईने मारले त्यात ते जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरवली आणि वाडेगाव पोलिस चौकीतही तसाच रिपोर्ट दिला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असता आलेल्या शवविच्छेदन अहवालावरून पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांना संशय आला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता मुलाने आणि सुनेनेच गंगाधर म्हैसने यांचा खून केल्याचे तपासात समोर आले. शुक्रवारी पोलिसांनी मुलगा विठ्ठल याला अटक करून त्याच्याविरुद्ध वडिलांच्या खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी ठाणेदार गजानन शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आकस्मिक मृत्यूच्या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी करून या घटनेचे गुढ उलगडले. उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनात पीएसआय काकडे तपास करीत आहेत.
मुलगा विठ्ठल हा पोलिस ठाण्यात रिपोर्ट द्यायला आला. तेव्हाच ठाणेदार गजानन शेळके व सहायक पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांना त्याच्यावर संशय होता. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल दोनदा पोलिसांनी मागवला. त्यात मृतकाला झालेल्या जखमा या गाईने मारल्याची शक्यता कमीत कमी असल्याचा अभिप्राय आला. त्यावरून पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यांनी गंगाधर यांच्या शेजारी राहणारे शिवराज देवलाल म्हैसने , सुरेश वासुदेव म्हैसने व उमेश भाऊराव म्हैसने यांना विचारपूस केली असता वेगळीच बाब समोर आली. माहिती देताना त्यांनी सांगितले की, गाय व गोरा अत्यंत गरीब आहेत. ते कुणालाही मारत नाहीत. मात्र विठ्ठल व त्याची भावजय संध्या म्हैसने या दोघांनी गंगाधरला मारले व त्यांच्या किंचाळण्याचा आवाज आम्हाला आल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी मुलगा विठ्ठल याला ताब्यात घेतले.
मुलगा विठ्ठल याने त्याचे वडिलाचा खून केल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. त्याला अटक केली असून या कामी त्याला त्याची भावजय संध्या म्हैसने हिने सहकार्य केले. तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर करू. – गजानन शेळके, ठाणेदार
अधिक वाचा : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, दोन गंभीर जखमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola