अकोला (प्रतिनिधी) : जिल्हयातील महत्त्वाची विकास कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे सांगितले. जिल्हयातील घरकुले, पाणीटंचाई, विमानतळ, मोर्णा नदीचा विकास, सांस्कृतिक भवन, महत्त्वाचे सिंचन प्रकल्प यासह शेतकऱ्यांशी संबंधित विषय प्राधान्याने मार्गी लावण्याबाबत त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी अकोल्यातील प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे सांगितले.
मंत्रालयातून व्हीसीव्दारे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व विभागप्रमुखांशी जिल्हयातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
घुग्घंशी बॅरेजमधून बंदिस्त पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी पंधरा दिवसाच्या आत डिझायन तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. तसेच नेरधामनाच्या कामासाठी वाढीव निधीच्या मागणीस मान्यता देण्यात आली. निंभोरा बंधाऱ्यासाठी निधी दिला जाईल. अकोट येथील अंतर्गत रस्त्यांची प्रलंबित कामांचे टेंडर काढण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. महत्त्वाकांक्षी मोर्णा नदीच्या विकासासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी शहानूर-नरनाळा रस्त्याच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणून आता जेथे उदयोग असतील उदा. दालमिलला व्हीटीपीचा दर्जा देऊन त्याच ठिकाणी उमेदवाराला प्रशिक्षण देऊन परिक्षा घेतली जाईल. जेणेकरुन त्या उदयोगासाठी मनुष्यबळ निर्माण होईल. पुढे त्याच ठिकाणी उमेदवाराला अप्रेटिसशिप मिळेल. त्याअंतर्गत त्याला चार-पाच हजार रुपयेही मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, श्री. परदेशी यांनी जिल्हयातील नेरधामणा व घुग्घंशी प्रकल्पाची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याची सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना केली. या प्रकल्पाचा दायित्वाच्या मुददयाचा निर्णय कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे यांच्या स्तरावर घेण्याबाबत त्यांनी सूचित केले. प्रलंबित सिंचन प्रकल्पांचे डिझाईन सीडीपीओ, नाशिक यांनी तात्काळ मंजूर करुन देण्याबाबतची सूचना त्यांनी केली प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत शहरी भागात घरकुलांची कामे त्वरेने मार्गी लावण्याबाबत सूचना करताना श्री. परदेशी म्हणाले की, नवीन शासन निर्णयाला अधीन राहून शासकीय जागेवरील अतिक्रमीत घरकुले नियमित करण्यासाठी नगर पालिकांनी तात्काळ प्रस्ताव पाठवावेत, त्यास मंजुरी देण्यात येईल. सिंचनाच्या कामासाठी रेतीघाट राखीव ठेवण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
देऊळगाव येथील बंद पडलेली पाणीपुरवठा योजना पुनर्जिवीत करण्यासाठी आराखडा पाठवावा, असे सांगून श्री. परदेशी म्हणाले की, 181 गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी लोकप्रतिनिधी व लोकांशी जिल्हाधिकारी यांनी चर्चा करुन देयक भरण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. मुर्तिजापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 11 कोटींचा निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बार्शिटाकळी तालुक्यातील चकनी येथील दलीत वस्तीतील विकास कामांचा 2 कोटींचा प्रस्ताव आयुक्त, समाजकल्याण यांनी मंजूर करण्याबाबत सूचित करण्यात आले. पिकविम्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
अकोला शहरातील सांस्कृतिक भवनासाठी रु. 20 कोटी अतिरिक्त निधीची मागणी जिल्हाधिकारी यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे श्री. परदेशी यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या वावर प्रकल्पासाठी निश्चितपणे आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. कौशल्य विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येणारे जयपूर रग उदयोग आणि कुशल अकोला यांच्या प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत त्यांनी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले. अकोला शहरातील सिमेंट रस्त्यांचे करण्यात आलेल्या सोशल ऑडिटबाबत सूचना करताना ते म्हणाले की, मनपा आयुक्तांनी संबंधीतांवर जबाबदारी निश्चित करुन कार्यवाई करावी.
विमानतळासाठी अतिरिक्त भूसंपादनाकरीता आवश्यक निधीबाबत कळविण्याची सूचना करुन श्री. परदेशी म्हणाले की, अकोट येथील न्यायालयीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. यावेळी त्यांनी जिल्हयातील रिक्त पदांचा आढावा घेऊन पदे भरण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा प्रारुप आराखडयाबाबत बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola