अकोला :- गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा आज अकोला जिल्हयात प्रारंभ झाला. जिल्हयातील सर्व शाळा, मदरसा येथे प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांनी बालकांना लस टोचली. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही लस दिली जाणार आहे. अकोला येथील होलीक्रॉस मध्यामिक विदयालयात महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते लस घेतलेल्या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, आरोग्य उपसंचालक डॉ. आर.एस. फारुखी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, लसीकरण क्षेत्रीय अधिकारी डॉ. ठोसर, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, विदयालयाच्या मुख्याध्यापिका निता फर्नानडेस आदींची उपस्थिती होती.
गोवर व रुबेलाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने गोवर-रुबेला लसीकरण ही महत्वाकांक्षी मोहिम शहरी व ग्रामीण भागात आजपासून सुरू केली आहे. जिल्हयातील 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 4 लाख 27 हजार 872 बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन आपल्या बालकांचे लसीकरण झाले असल्याची खात्री करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. खासगी शाळांमध्ये, अंगणवाडी, सरकारी दवाखाने, आरोग्य उपकेंद्रे यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
अशी आहे लसीकरण मोहीम -आजपासून पाच आठवडे लसीकरण मोहीम. 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकाचे लसीकरण करणे आवश्यक. शाळा, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांवर मोफत लसीकरण उपलब्ध. या आधी गोवर/ एम आर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक. पुन्हा लसीकरणाने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. एक गोवर-रुबेला लस दोन आजारांवर मात करते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola