अकोला – दुष्काळसदृश स्थितीची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांसाठी दुष्काळी उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनेचाच एक भाग म्हणून पाचही तालुक्यातील ५२ हजार ८०० विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रात मोफत एसटी प्रवास करता येणार आहे.
ही सवलत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिक्षण घेण्यास जाणाऱ्या गाव-खेड्यांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. हे सर्व विद्यार्थी जुलै २०१८ चे चालू शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून दरमहा पासेस काढतच आहेत. आता मात्र १५ नोव्हेंबर ते शैक्षणिक सत्र संपेपर्यंतचे त्यांचे पैसे राज्य शासन भरणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत. त्या २४ नोव्हेंबरपासून पूर्ववत होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पासेस दिल्या जातील, असे एस.टी. महामंडळ प्रशासनाचे नियोजन आहे. एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्याने राज्य मुख्यालयाकडे ६५ हजार पासेसची मागणी केली होती. दरम्यान शासकीय मुद्रणालयांतून तेवढ्या पासेस जिल्ह्याला प्राप्त झाल्या असून त्या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. दुष्काळी उपाययोजना घोषित करताना शासनाने कर्जवसुली, वीज बिल वसुलीस स्थगिती, शेतसारा उशिरा भरण्याची मुभा, परीक्षा शुल्काची प्रती पूर्ती आदी सवलती लागू केल्या आहेत. विद्यार्थ्यांना मोफत पासेस ही त्यापैकीच एक सवलत आहे.
वाशीम जिल्हानव्याने तयार झाला असला तरी त्या जिल्ह्यातील एसटी कारभार अकोला येथील विभागीय कार्यालयातूनच चालवला जातो. दरम्यान वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुकाही दुष्काळी उपाययोजनेसाठी शासनाने पात्र ठरवला आहे. त्यामुळे त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही मोफत पासेस दिल्या जातील. या पासेसची संख्या १० हजार ८०० एवढी आहे.
अशी आहे डेपोनिहाय विद्यार्थी संख्या :
अकोला डेपो (टॉवर) व बार्शीटाकळी १५,०००
मध्यवर्ती बसस्थानक व बाळापूर २१,०००
तेल्हारा डेपो ९,०००
मूर्तिजापूर डेपो ७,८००
एकूण ५२,८००
दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत शाळा पुन्हा सुरु होत आहेत. या वेळी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना ह्या पासेस दिल्या जातील. तशा सूचना विभागातील सर्व बसस्थानक प्रमुखांसह संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.- प्रशांत जाधव, पास वितरण अधिकारी, अकोला.
अधिक वाचा : देशभरात गुरुकुल समकक्ष आचार्य कुलम्सुरु करणार साध्वी देवप्रिया यांची पत्रकार परिषदेत माहिती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola