अकोला (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान घेतलेल्या बैठकीत विविध विकास कामांसह प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांची अद्यापही पूर्तता झालेली नसताना आज पुन्हा आढावा बैठीकीसाठी येत आहेत. अकोल्यात प्रश्न खुप आहेत. समस्या सुटण्याची गती कमी आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाळी अधिवेशना दरम्यान आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी विनामूल्य जागा तसेच जनता भाजी बाजार, जुने बस स्थानक, विश्राम गृहासमोरील जागेवर वाणिज्य संकुल, ऑडिटोरियम आदी बांधण्यासाठी या जागांचा आगाऊ ताबा देवून स्वामित्व धनातून जागेचे पैसे भरणे आदी बाबी मान्य केल्या होत्या. त्याच बरोबर एसटीपी प्लॉन्टला तत्काळ मान्यताही दिली होती. याच बरोबर प्रधानमंत्री आवास योजनेत येणाऱ्या अडचणी, भूमिगत गटार योजनेच्या कामावरील स्थगिती लवकरच उठवण्यात येईल, आदी आश्वासने मुख्यमंत्र्यांनी दिली होती. या आश्वासनापैकी महापालिकेला प्रशासकीय कार्यालयांसह विविध विकास कामांसाठी चार जागा जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला देण्यात आल्या मात्र प्रीमियमचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही तसेच प्रशासकीय इमारतीसाठी कोणतेही शुल्क न आकारता महापालिकेला अद्यापही जागा मिळालेली नाही. परिणामी या आश्वासनांची पूर्तता पूर्ण झालेली नाही. तर दुसरीकडे अमृत योजनेसह विविध कामे शहरात सुरु असली तरी या विकास कामांकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेसह विविध शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची हजारो पदे रिक्त अाहेत. त्यामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर येथील याच बैठकीत शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये जागेबाबत नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने नमुना ८ अ, गावठाण, स्लम याबाबतची कागदपत्रांद्वारे नकाशा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली असता प्रायव्हेट आर्किटेक्ट कडून ले-आऊट तयार करण्या बाबत व संबंधितांचे नकाशे मंजूर करण्यात यावे व यामध्ये शुल्क अतिशय कमी आकारण्यात यावे, आदी सुचना संबंधित विभागाच्या सचिवांना मुख्यमंत्र्यांनी केली होती. या महत्त्वपूर्ण आणि लाखो नागरिकांच्या फायद्याच्या आश्वासनांची अंमलबजावणीही अद्याप झालेली नाही.
अधिक वाचा : हॉकीचे मैदान, विज्ञान केंद्र आणि बालसुरक्षेला प्राधान्य : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील