अकोला: वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपुर्वक फ़ेरफ़ार करून होणा-या वीजचो-यांची माहिती असणा-यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणा-याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल, अशी माहीती महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिली आहे.
आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीजचोरी कळवणाऱ्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनाही ही बक्षीस योजना लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुर्वी वीजचोरीची माहिती कळवल्यानंतर एक हजार रुपयांचे बक्षीस होते. मग ती वीजचोरी लाखो रुपयांची का असेना. त्यामुळे साहजिकच हवा तितका प्रतिसाद नव्हता. त्यामुळे आता वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. या उपक्रमात ५० हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसाची रक्कम मंजूर करण्याचे अधिकार ‘महावितरण’च्या क्षेत्रीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. तर एक लाखापर्यंतच्या बक्षिसाचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहेत. बक्षिसाची रक्कम एक लाखापेक्षा अधिक होत असल्यास ती देण्याचे अधिकार मुख्य अभियंत्यांना असतील. याशिवाय संचालक (दक्षता व सुरक्षा) यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.
वीजचोरी कळवणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोखीने देण्यात येईल. तर त्यावरील पैसे नेटबँकिंगच्या माध्यमातून देण्यात येतील. लोकांनी वीजजोरीची माहिती ‘महावितरण’च्या संकेतस्थळावरील ‘रिपोर्ट एनर्जी थेफ्ट’ येथे कळवावी. तर ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी वीजचोरीची माहिती थेट संचालक (दक्षता व सुरक्षा) यांना दूरध्वनीवरून देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या https://www.mahadiscom.in/report-energy-theft/ या संकेतस्थळावरील लिंकवर “वीजचोरी कळवा आणि लाखो रुपये मिळवा‘ असा विभाग आहे. तिथे क्लिक केल्यानंतर माहिती कळविण्याबाबतचे आवाहन केले आहे. त्यानंतर “कळवा‘ या शब्दावर क्लिक केल्यानंतर वीज चोराची माहिती ऑनलाइन भरता येते. त्यात संशयिताचे नाव, पत्ता व चोरीची पद्धत लिहायची आहे. त्या खाली स्वत:चे नाव व पत्ता. माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. याचप्रमाणे महावितरणच्या मोबाईल ॲप वरुनही वीजचोरीची माहीती कळविण्यासाठी विशेष लिंक देण्यात आली आहे, वीजचोरीचे छायाचित्र अपलोड करण्याची सुविधाही या ॲपवर देण्यात आली आहे.. खातरजमा केल्यानंतर संबंधित माहिती देणाऱ्याला रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी अडीच लाखांपर्यंत बक्षीस मिळू शकते. वीज चोरीची माहीती कळविल्याच्या एका महिन्यानंतर माहीती देणा-यांनी 022-22619100, 22619200 किंवा 22619300 या क्रमांकावर फ़ोन करून त्यांनी कळविलेल्या वीजचोरीच्या माहीतीवर झालेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर तपशिल दिल्या जाईल. या सुविधेचा लाभ घेत जागरूक नागरिकांनी वीजचोरी रोखण्यात महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola