अकोला-बॅडमिंटन कोचने खेळाडू मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजीच असताना आणखी एका कबड्डी कोचचे कुकृत्य समोर आले आहे. खेळाडू मुलींची राज्यस्तरावर निवड करण्याचे आमिष दाखवून कबड्डी कोचने एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शिवणी येथे घडली आहे. मुलीच्या बयाणावरून एमआयडीसी पोलिसांनी नराधम कोचला सोमवारी ३० जुलैला सायंकाळी बेड्या ठोकल्या.
शुद्धोधन सहदेव अंभोरे (वय ४२, रा. शिवणी) असे नराधम आरोपी कोचचे नाव आहे. आरोपी हा शिवणी येथे प्रशिक महिला कबड्डी संघाचा प्रशिक्षक आहे. त्याच्याकडे सध्या १५ ते २० मुलींची बॅच आहे. या बॅचमधील एका १७ वर्षीय मुलीचा तो विशेष सराव घेऊ लागला. त्यातूनच मुलीला राज्यस्तरावर चमकवणार असल्याचे सांगू लागला. सरावा दरम्यान त्याने वर्षभरापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर कुणाला काही न सांगण्याची त्याने धमकी दिली व सातत्याने सरावादरम्यान बलात्कार केला. आरोपी कोचच्या भीतीपोटी पीडित मुलीने याची वाच्यता केली नाही, त्यानंतर मुलीला गर्भधारणा झाली. सोमवारी सर्वोपचार रुग्णालयात पीडितेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर ठाणेदार किशोर शेळके यांनी पीडित मुलीचे बयाण घेतले. दरम्यान तिने आपबीती सांगितल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी आरोपी शुद्धोधन सहदेव अंभोरेला अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
पीडित मुलगी कोचच्या मुलीच्या वयाची
ज्या खेळाडू मुलीवर आरोपी कोचने लैंगिक अत्याचार केले. ती पीडिता आरोपीच्या मुलीच्या वयाची आहे. शिवणी परिसरात या घटनेची वाच्यता झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.
क्रीडाक्षेत्राला काळिमा
क्रीडा क्षेत्रात कोचकडून लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. यापूर्वी जिम्नॅस्टिक कोचने अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बॅडमिंटन कोचने खेळाडू मुलीचे लैंगिक शोषण केले. तर दोन महिन्यापूर्वी जिमच्या कोचने एका महिलेला पळवून नेल्याची घटना घडली. दोन वर्षात घडलेल्या चार घटना क्रीडा क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या आहेत.
आणखी मुली समोर येण्याची शक्यता
आरोपी शुद्धोधन सहदेव अंभोरे याला मंगळवारी न्यायालयात हजर करणार आहोत. आम्ही त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करू. आणखी किती मुलीचे त्याने लैंगिक शोषण केले. हे तपासादरम्यान समोर येणार आहे.
– किशोर शेळके, ठाणेदार एमआयडीसी पोलिस ठाणे, शिवणी