अकोला, दि. 21 :- मतदार यादीचा अर्हता दिनांक 1 जानेवारी 2019 वर आधारीत विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमतंर्गत मतदान केंद्राच्या सुसुत्रिकरण व प्रमाणिकरण संबधी आढावा बैठक जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी अकोला उपविभागीय अधिकारी संजय खडसे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, तहसिलदार विजय लोखंडे, नायब तहसिलदार निवडणूक सतीश काळे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजकीय पक्षांना संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाची व नविन मतदान केंद्राची तसेच मतदान केंद्र सुसुत्रिकरणाची माहिती व्हावी. यासाठी सर्व राजकीय पक्षांना आंमत्रित करून त्यांची बैठक् घेण्यात आली.
मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण करतांना निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर VVPAT चा वापर केला जात असल्यामुळे ग्रामीण व शहरी मतदान केंद्राकरीता असलेली कमाल मर्यादा अनुक्रमे 1200 व 1400 अशी राहणार आहे. ज्या ठिकाणी ही मर्यादा शिथील करावयाची असल्यास किंवा नवीन मतदान केंद्र तयार करावयाचे असल्यास मतदान केंद्राचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करणे जरूरी आहे. सुसुत्रिकरण करतांना एका कुटूंबातील सदस्य त्यांच्या शेजारी व त्याच पत्यावर राहणारे मतदार एकाच मतदान केंद्रात समाविष्ठ होतील असे पाहावे. मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण करतांना कुटूंबाच्या सदस्याची विभागणी होणार नाही. तसेच एका इमारतीतील मतदार एकाच भागात असावे तसेच कोणत्याही मतदाराचे मतदान केंद्र 2 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर असू नये.
अकोला जिल्हयात मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व नविन मतदार केंद्रे एकुण 93 तयार करण्यात आली आहे. यापुर्वी जिल्हयात 1585 मतदान केंद्रे होती. आता 1678 मतदान केंद्रे झालेली आहेत. याबाबतची माहिती जिल्हयातील सर्व तहसिल व उपविभागीय कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबतची काही दुरूस्ती असल्यास त्यानुसार प्रस्ताव तयार करून मुख्य निवडणूक अधिका-याकडे सादर करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या सुचनेनुसार 24 जुलै 2018 रोजी जिल्हयातील खासदार, आमदार, सर्व आजी माजी लोकप्रतिनीधी तसेच विविध मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे अध्यक्ष , पदाधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी काया्रलयाच्या नियोजन भवनात सकाळी 11.00 वाजता आयोजीत केलेली आहे. या बैठकीमध्ये सर्व विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी , तहसिलदार आपल्या मतदार संघातील मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व नविन मतदार केंद्राची माहिती प्रेझेंटेशन व्दारे उपस्थितांना देणार आहेत. यामध्ये काही त्रृटी किंवा सुचना असल्या तर लोकप्र्रतिनीधी तसेच विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी वेळीच लक्षात आणुन दयाव्या अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.