छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब हा घटक न मानता व्यक्ती घटक मानण्याचा महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सदस्य प्रकाश आबिटकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली.
यामुळे आधी कुटुंबाला मिळणारी दीड लाख रुपयांची कर्जमाफी आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या मिळणार असून यामुळे जास्तीत जास्त शेकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुंबप्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती. आता कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या नावावर कर्ज आहे, त्या सर्वांना कर्जमाफीचे लाभ मिळतील.
प्रत्येक कुटुंबातील पती, पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विधानसभेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी निवेदनाव्दारे या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहे. त्यापैकी १ लाख ८८ हजार खातेदारांना ३७७ कोटी वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित ८२ हजार शेतकऱ्यांच्या ऑनलाइन माहितीत त्रुटी असल्याने रक्कम जमा झालेली नाही. या त्रुटींची पूर्तता करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी चर्चेत सदस्य अजित पवार, दीपक चव्हाण, किशोर पाटील, चंद्रदीप नरके, शंभूराजे देसाई, समीर कुणावार यांनी भाग घेतला.
अधिक वाचा : दुधाला अनुदानाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली