अकोला : एक दिवसीय ‘आम्ही कारभारणी’ प्रशिक्षण अभियान
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पुढाकाराने व ‘रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या सहकार्याने राज्यातील पंचायतीमध्ये निवडून आलेल्या महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत महिला लोकप्रतिनिधींसाठी एक दिवसीय ‘कारभारणी प्रशिक्षण अभियान’ राबविण्यात येणार आहे
२६ जून रोजी नाशिक जिल्ह्यातील कार्यशाळेपासून या अभियानास सुरुवात होणार असून, २० ऑगस्ट रोजी सांगली, पालघर, अकोला, उस्मानाबाद या जिल्ह्यामधील कार्यशाळेने या अभियानाची सांगता होणार आहे. तीस जिल्ह्यांतील किमान ९०० महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पंचायत स्तरावरील महिला लोकप्रतिनिधींची गरज लक्षात घेऊन ग्रामीण स्तरावरील महिला लोकप्रतिनिधींना राज्य महिला आयोगाच्या कार्याची ओळख करून देणे, महिलांसाठी असलेल्या कायद्यांची आणि सरकारी आदेशाबद्दलची माहिती देणे. ग्रामपंचायत अर्थसंकल्प, शासन आदेश, ग्रामपंचायत योजना, पंचायत यंत्रणा, नव कल्पना आणि पंचायती राजमधील प्रयोग समजून घेणे या उद्देशाने कारभारणी प्रशिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. तसेच या प्रशिक्षणातून ग्रामपंचायत बॉस (बजेट, ऑर्डर, स्कीम्स आणि सर्व्हिसेस) समजून घेणे, पंचायतीमधील सर्वोत्तम कार्यक्रमांची मांडणी करणे आदी माहिती देण्यात येणार आहे.
ग्रामीण स्तरावरील महिला लोकप्रतिनिधींना राज्य महिला आयोगाच्या कार्याची ओळख करून देणे, महिलांसाठी असलेल्या कायद्यांची आणि सरकारी आदेशाबद्दलची माहिती देण्यासाठी हे प्रशिक्षण अभियान राबविण्यात येत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.
अधिक वाचा : श्री. संत रूपलाल महाराज पालखीचे दानापूर येथे स्वागत