भारत विरुद्ध आयर्लंड : रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या आक्रमक अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात आयर्लंडवर ७६ धावांनी मात केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद २०८ धावा केल्या. यानंतर आयर्लंडला ९ बाद १३२ धावांत रोखले. यासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होईल.
या लढतीत आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवनने आक्रमक सुरुवात केली. या जोडीने १६ षटकांत १६० धावांची सलामी दिली. या जोडीने १०.१ षटकांतच धावांचे शतक फलकावर लावले होते. रोहितने ३९ चेंडूंत, तर धवनने २७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. १६व्या षटकात ही जोडी फुटली. रोहितने ६१ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ९७, तर धवनने ४५ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ७४ धावा केल्या. यानंतर रैना, धोनी, विराट कोहली यांना फटकेबाजी करण्यात अपयश आले. अखेरच्या चार षटकांत भारताने चार फलंदाज गमावले. आयर्लंडकडून चेसने चार बळी मिळवले.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर शनॉनचा अपवाद वगळता एकालाही भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. भारताच्या कुलदीप यादव आणि यझुवेंद्र चहल यांनी आयर्लंडच्या फलंदाजांची फिरकी घेतली. शनॉनने ३५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६० धावा केल्या. कुलदीप यादवने चार, तर चहलने तीन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक : भारत – २० षटकांत ५ बाद २०८ (रोहित शर्मा ९७, शिखर धवन ७४,सुरेश रैना १०, महेंद्रसिंह धोनी ११, हार्दिक पंड्या नाबाद ६, विराट कोहली ०, मनीष पांडे नाबाद ०, चेस ४-३५, ओब्रायन १-३६) वि. वि. आयर्लंड – २० षटकांत ९ बाद १३२ (शनॉन ६०, थॉम्प्सन १२, कुलदीप यादव ४-२१, चहल ३-३८, बुमराह २-१९).
अधिक वाचा : खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार