*पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी)- किराणा दुकानातील पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे.या निर्णयामुळे किरकोळ दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल आदी वस्तूंच्या विक्रीसाठी किरकोळ पॅकेजिंगवरची बंदी उठवण्यात आली आहे.
मोठ्या उत्पादकांना आपले उत्पादन प्लास्टिक पॅकिंगमध्ये सवलत देण्यात आल्यानंतर आता किराणा दुकानातील प्लास्टिक पॅकिंगलाही सूट देण्यात आली असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. पाव किलो पेक्षा अधिक वजनाचा माल पॅकिंग करण्यासाठी ही सूट असणार आहे. हे प्लास्टिक पुन्हा रस्त्यावर येणार नाही त्याचे रिसायकलिंग केले जाईल याची काळजी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे.
किराणा दुकानदारांच्या शिष्टमंडळाने प्लास्टिक पॅकिंगसाठी सूट मिळावी म्हणून शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. प्लास्टिक पॅकिंग बाबतच्या या प्रस्तावाबाबत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत किरणा दुकानांवरील प्लास्टिक पॅकिंगसाठी असलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे पर्यावरणमंत्री कदम यांनी सांगितले.
पाव किलो वरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लास्टिक बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आली असला तरी हे प्लास्टिक परत घेण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची असणार आहे. हे प्लास्टिक रस्त्यावर येणार नाही याची काळजी संबंधित दुकानदारांना घ्यावी लागणार आहे.