मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरूवारी भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावल उचलावीत यासाठी आमदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने उद्या गुरुवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांची बैठक बोलावून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका निश्चित करीत कॅांग्रेस,राष्ट्रवादीने मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या आमदारांची बैठक मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण देण्याची भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. मात्र भारतीय जनता पक्षाकडून मराठा आरक्षणाबाबत आपल्या आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यात आलेले नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. त्याचा परिणाम भाजपा विरोधात संताप वाढण्यात झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने या बैठकीला महत्त्व आले आहे. ही बैठक उद्या गुरुवारी दुपारी दोन वाजता वसंती स्मृती दादर येथे आयोजित केली आहे.