येत्या दोन महिन्यांत पवित्र पोर्टल च्या माध्यमातून राज्यात 18 हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.
शिक्षण व क्रीडा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते. पवित्र पोर्टल मुळे शिक्षणसंस्थांना गुणवत्ता यादीनुसार भरती करावी लागणार असल्याचे सांगत तावडे यांनी राज्यातील अर्धवट क्रीडा संकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येत असल्याची माहिती दिली. शासनाने 30 खेळाडूंना थेट सरकारी सेवेत नियुक्ती दिली असून, 11 हजार 460 खेळाडूंची प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
वन विभागाच्या मागण्यांवर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये बळी पडणार्यांना पूर्वी आठ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जात असे. त्यात आता 2 लाख रुपयांनी वाढ करून ही भरपाई 10 लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामध्ये रोख तीन लाख रुपये, तर सात लाख रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवण्यात येणार आहे.
शेतकर्यांच्या जनावरांच्या नुकसानभरपाईतदेखील वाढ करण्यात आली असून, 25 हजारांवरून ही रक्कम आता 40 हजार एवढी करण्यात आली आहे.ऊर्जा विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, वीजहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, काही ठिकाणी हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत आहे. ते 15 टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन लाख शेतकर्यांना पेड पेंडिंग अंतर्गत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून एक शेतकरी एक ट्रान्स्फार्मर ही उच्च वीज वितरण प्रणाली योजना सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे कृषीसाठी शाश्वत वीजपुरवठा मिळणे शक्य होणार आहे.
अधिक वाचा : स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली सर्वोत्तम शैक्षणिक संस्था