लातूर : मुस्लिमांनी फक्त आम्हालाच मतदान करावे, असे आवाहन एम.आय.एम. करत आहे. असे आवाहन आम्ही हिंदूना केले तर आम्ही जातीयवादी ठरतो. त्यांना कोणी काही बोलत नाही. “एम.आय.एम’.सारख्या जाती-जातीत फुट पाडणाऱ्यांना अडविण्याची हिंमत अर्धी चड्डी घालणाऱ्यांमध्ये नाही. गृहखात्याच्या अंगात पाणी असेल तर त्यांनी ही हिंमत दाखवावी. पण ती हिंमत केवळ शिवसेनेतच आहे अशी घणाघाती टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरूवारी रा. स्व. संघ व भा.ज.पा. वर केली. कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा मेळावा लातुरात आयोजिण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली होती. ” हे तुम्हीच करू शकता ‘ म्हणत देसाई यांनी सैनिकांना जागे केले.
शिवाय, लोकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्या, असे सांगून त्यांनी समस्यांकडे लक्षही वेधून घेतले. या वेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, शिल्पा सरपोतदार, अभय साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीवेळी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करू असे मोदींनी सांगितले होते.
आत्तापर्यंत 15 चिंचुकेही आले नाहीत. तेच रोजगाराचे, शेतमालाचे, दूध दराचे झाले आहे. असे असंख्य प्रश्न जनतेसमोर आहेत. ते सोडविण्यासाठीच शिवसेनेला स्वबळावर सत्ता हवी आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आधीपासून झटत आहे. यापुढेही झटत राहणार आहे. लोकांनाही शिवसेनाच आपल्याला न्याय देईल, असे वाटू लागले आहे, असेही देसाई यांनी आवर्जून सांगितले.
अधिक वाचा : प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी