मुंबई – हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित मुंबई- पुणे मार्गावरील अतिवेगवान रेल्वे प्रकल्पासाठी हालचाली वेगात सुरु असतानाच अमेरिका दौऱ्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीतील एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या व्हिडिओत भेटीबाबत माहिती दिली असून या व्हिडिओतून प्रस्तावित ‘हायपरलूप’ची पहिली झलकच पाहायला मिळते.
राज्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी ‘व्हर्जिन हायपरलूप’ या कंपनीच्या चाचणी केंद्राला भेट दिली होती. पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास हायपरलूप तंत्रज्ञानामुळे अवघ्या २० मिनिटांमध्ये करता येणार असून संबंधीत कंपन्यांच्या अभियंत्यांचे पथक त्यासाठी पुण्यात दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घडामोडी घडत असतानाच मंगळवारी रात्री एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबद्दल व्हिडिओत माहिती दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही भेट सकारात्मक झाल्याचे सांगितले. भारतात हायपरलूप तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता आहे. हा प्रकल्प भारतात विविध मार्गावर कसा राबवता येईल, याबाबत विचार करत आहोत, असे कंपनीचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख रॅन केली यांनी सांगितले. प्रस्तावित हायपरलूपचे भारतातील डबे कसे असतील, याची या व्हिडिओत झलक दिसते.
पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी १५ किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. केवळ २० मिनिटांवर मुंबई-पुणे अंतर आणणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी ७० टक्के सामुग्री आणि उपकरण हे महाराष्ट्रातच उपलब्ध होऊ शकणार आहेत. दीड लाख टन कार्बनचे उत्सर्जन या १०० टक्के इलेक्ट्रिक व कार्यक्षम प्रणालीमुळे प्रतिवर्षी कमी होणार असून वेळेची बचत, पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका असे अनेक सामाजिक व आर्थिक फायदेसुद्धा होणार आहेत.