नागपूर: शेतकरी कर्जमुक्तीसाठी रोखले गेलेले, नागपुरातून जाणारे महामार्ग आज (दि.२९) दुसऱ्या दिवशीही सकाळी जाम आहेत. दुपारी १२ पर्यंतचा अल्टिमेटम आंदोलकांनी दिली आहे. हजारो वाहने खोळंबली आहेत. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलनाची राज्य सरकारने कुठलीच दखल न घेतल्याने आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. पंजाबच्या धर्तीवर आज रेल्वे रोको करू, थेट दिल्लीपर्यंत त्याचे पडसाद उमटतील, यापूर्वी पाहिलेले देवाभाऊ आज शेतकऱ्यांविषयी काळजी घेताना दिसत नाही असा आरोप त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
विविध सामाजिक आंदोलनाची तातडीने दखल घेणारे, भेटण्यास जाणारे सरकार शेतकरी आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाहीत असा आरोप केला. मंगळवारी (दि.२८) पोलिस प्रशासनाला गाफील ठेवत गनिमी काव्याने सभास्थळापूर्वीच त्यांनी हे चक्का जाम, ठिय्या आंदोलन सुरू केले. आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आंदोलकांनी दिला आहे. बंदोबस्त वाढविला गेला आहे.
दुसरीकडे वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद,अमरावती, जबलपूर हजारो वाहने खोळंबल्याने या मार्गावरील प्रवासी, सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना देखील मोठा फटका बसला. काही महाविद्यालयांनी देखील आज सुट्टी जाहीर केली आहे. वर्धा रोडवर गवसी मानापुर परिसरात बच्चू कडू यांचे हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. कर्जमुक्ती, दिव्यांगाना सहा हजार महिना आदी इतर मागण्यांवर निर्णय न झाल्यास रेल्वे रोको प्रसंगी नागपूर विमानतळाचा रस्ता देखील आम्ही रोखून धरू असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत हे आंदोलन आज सरकारने चर्चा न केल्यास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.










