तेल्हारा (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिसांनी यंदाच्या गणेशोत्सवात समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. पोलिस स्टेशनमधील बाप्पाची मिरवणूक कोणत्याही ढोल-ताशांच्या गदारोळात किंवा आधुनिक साऊंड सिस्टीमशिवाय, चक्क पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून काढण्यात आली.
पारंपरिक वेशभूषा, फेटे, ढोलकी, टाळ-मृदंग आणि हरित वातावरणात नटलेली ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सजवलेल्या बैलगाडीत बसवलेला बाप्पा, पारंपरिक गोधडी व रंगीबेरंगी सजावट केलेले बैल आणि फेटे परिधान केलेले पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. पोलिस हे केवळ कायद्याचे रक्षक नसून समाजातील संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण यांचा आदर राखणारे आहेत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आधुनिक युगात वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी दाखवलेला हा पर्यावरणपूरक मार्ग समाजासाठी प्रेरणादायी आहे. या मिरवणुकीत स्थानिक नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला. सर्वांनी “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात, पर्यावरणपूरक व पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. तेल्हारा पोलिसांचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून, समाजासमोर आदर्श घालून देणारी ही मिरवणूक खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरली आहे.