पातूर (सुनिल गाडगे) : – शहरातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली होती. १३ दिवसांपूर्वी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, अद्यापपर्यंत ना मुलीचा शोध लागला ना पोलिसांनी आरोपीला पकडले. अशा प्रकरणात पोलिस तातडीने तपास करत नसतील तर, अल्पवयीन मुलींचे आयुष्य बरबाद होणार नाही तर काय, असा संतप्त सवाल उपस्थित केल्या जात आहे.
पातूर शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सदर मुलीचे आईवडील अत्यंत गरीब परिस्थितीतील असून पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करतात. अशाच या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर पीडित मुलीच्या पालकांनी पातूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती.दहा दिवस उलटूनही मुलीबद्दल काहीच माहिती पोलिसांकडून मिळाली नसल्याने पीडिताचे आईवडीलांची घालमेल होत आहे. पोलीस मात्र याबाबत कमालीचे उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
दामिनी पथक कुचकामी मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस ठाणेनिहाय दामिनी पथकाचे गठण करण्यात आले आहे. मात्र, अनेकदा असामाजिक तत्वांना वठणीवर आणण्याऐवजी तसेच मुलींची छेड काढणाऱ्याविरुद्ध ठोस कारवाई करताना दामिनी पथक दिसत नाही. दामिनी केवळ त्यांना मिळालेल्या शासकीय वाहनावर फिरून आपल्या ड्युटी पॉईंट वर सेल्फी व रिल बनवत असल्याचे दिसून येते. पातूर शहरात तीन मुख्य चौक आहेत व त्या तीनही चौकांमधून शाळकरी मुलींची वरदळ असते तेथे कारवाईची गरज आहे. पोलिस अधीक्षक या सर्व प्रकरणाचा आढावा घेतील काय, मागणी होत आहे.