अकोला,दि.21: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यात 22 रूग्णालये समाविष्ट आहेत. या योजनेची व संबंधित रूग्णालयांची माहिती सर्वदूर पोहोचवावी जेणेकरून गरजूंना त्याचा लाभ मिळू शकेल, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजनेच्या जिल्हा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सोमवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीच्या सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. डी. करंजेकर, योजनेचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे, जिल्हा समन्वयक डॉ. शीतल गावंडे, डॉ. नागेंद्र वाघ, श्याम फाले आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात तीन शासकीय व 19 खासगी रूग्णालये अंगीकृत आहेत. योजनेत उपचार खर्चाची मर्यादा पाच लाख रू. असून, ही योजना गरीब व गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या रूग्णालयांत दाखल रूग्णांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन अधिकाधिक रूग्णांना लाभ कसा मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावे. रूग्णालयांसंबंधी तक्रार असल्यास तत्काळ निवारण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
समाविष्ट रूग्णालये : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, तसेच मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रूग्णालय ही शासकीय रूग्णालये योजनेत समाविष्ट आहेत. अकोला येथील सिटी हॉस्पिटल, डॉ. के. एस. पाटील हॉस्पिटल, मुरारका हॉस्पिटल, भागवतवाडी येथील माऊली हॉस्पिटल, न्यू ग्लोबल हॉस्पिटल, रिधोरा रस्त्यावरील रिलायन्स हॉस्पिटल, संत तुकाराम हॉस्पिटल, रामदासपेठेतील श्रीमती बी. एल. चांडक हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल, शुक्ला चिल्ड्रेन हॉस्पिटल, अकोट फैल येथील फातेमा नर्सिंग होम हुसैनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, उमरी रस्त्यावरील न्यू विठ्ठल हॉस्पिटल, सन्मित्र मानस व्यसनमुक्ती केंद्र या खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, मूर्तिजापूर येथील केळकरवाडीतील ठाकरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, समर्पण हॉस्पिटल, मेहेर ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, आधार चॅरिटेबल हॉस्पिटल, बाबन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अवघाते बालरूग्णालय आदींचा समावेश आहे.