अकोला,दि.6 : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी यंत्रणेत 3 इंटरसेप्टर वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सदोष वाहन तपासणी, तसेच अतिवेगाने चालणाऱ्या व नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईला वेग येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.
तपासणी ताफ्यात 3 वाहनांची भर पडल्याने आता एकूण 4 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यात स्पीड गन, ब्रेथ ॲनालायझर, टायर ट्रेंड ग्रेज ही उपकरणे उपलब्ध आहेत. स्पीड गनद्वारे अतिवेगातील वाहनांवर, तसेच ब्रेथ ॲनालायझरच्या तपासणीद्वारे दारु पिऊन वाहन चालणाऱ्या वर कारवाई करण्यात येईल. या वाहनांतील लेझर कॅमेऱ्याद्वारे तपासणीतून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती दुतोंडे यांनी सांगितले.
वाहनांतील उपकरणे अद्ययावत व तंत्रदृष्ट्या अधिक प्रभावी आहेत. त्यामुळे वाहतुकीत दोषी आढळणाऱ्या वाहनांची तत्काळ नोंद होऊन वाहनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जाईल. अपघात टाळण्यासाठी व आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी रस्त्यावर वाहन चालविताना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.