पातूर :- (सुनिल गाडगे) ग्रामीण भागातील जीवनशैली आज प्रामुख्याने सर्वच मराठी वाहिन्यांवर समोर येताना दिसत आहे. तसेच ग्रामीण भागातील कलावंतांच्या बाबतही टॅलेंट कुठं कमी नाही, याची प्रचिती आज बाल कलावंत राघव गाडगेच्या रूपानं येत आहे. अकोला जिल्ह्यातील ग्राम शिर्ला (ता.पातूर )येथील बाल कलाकार राघव विद्या निलेश गाडगे हा बाल कलावंत कलर्स मराठी चॅनल वरील ‘ इंद्रायणी ‘ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे.
मराठी चित्रपट किंवा मालिकामध्ये ग्रामीण क्षेत्रातील ‘ ग्राम ‘ जीवनशैलीचा प्रभाव परत एकदा दिसायला लागला आहे. गत पांच वर्षांपासून अकोला जिल्ह्यात आयोजित केल्या जाणाऱ्या विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेमध्ये यंदा उत्कृष्ट पुरुष बालकलावंत म्हणून गौरविलेला पातूर स्थित एज्युविला पब्लिक स्कूलचा विद्यार्थी राघव विद्या निलेश गाडगे याची निवड कलर्स मराठीच्या ‘ पोतडी एंटरटेंटमेंट ‘ चे दिग्दर्शक विनोद लव्हेकर आणि निखिल सेठ यांनी ‘ इंद्रायणी ‘ या मालिकेसाठी केली. ज्यामध्ये राघव गाडगे अधोक्षज महाराज यांची भूमिका साकारत आहे. कलर्स मराठी चॅनल वरील इंद्रायणी या लहान मुलांसोबत वारकरी माध्यमातून मनोरंजनसोबत मूल्यशिक्षण देणाऱ्या मालिकेत प्रमुख भूमिका बजावताना ग्रामीण कलावंत म्हणून राघव दिसत आहे. कुठलीही कौटुंबिक पृष्ठभूमि नसताना, कलर्स सारख्या एका मोठ्या मराठी मालिका वाहिनीवरून दररोज प्रसारित होणाऱ्या ‘ इंद्रायणी ‘ ह्या दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकेत बाल कलावंत म्हणून राघवची निवड होणं , ही कौतुकाची नव्हेतर अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
एज्यूविला पब्लिक स्कूल च्या प्राचार्या सौ विद्या गाडगे व पुलिस खात्यात अत्यंत सक्षमपणे सेवा देणारे निलेश गाडगे ह्यांचा राघव हा मुलगा आहे. राघव हा केवळ एक उत्कृष्ठ नाट्य कलावंतच नव्हे तर, उत्कृष्ठ वादक तथा दांडपट्टा सारखी शिवकालीन मैदानी व मर्दानी युद्धकला पारंगत सुध्दा आहे. विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेचे प्रमुख प्रा. मधू जाधव, स्पर्धा संयोजक प्रशांत गावंडे, प्राचार्या प्रतिभा फोकमरे, रितेश महल्ले,दिग्दर्शक ओमकार दामले,सुशील वळंजू, ज्येष्ठ नाट्यपरीक्षक धनंजय सरदेशपांडे,यतीन माझीरे ,जेष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण काळपांडे,तथा सर्व सहकलाकार ,कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप शेवलकार ,झेप युथ फाउंडेशन चे नंदकिशोर ठक,एज्युविला पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका ,सर्व शिक्षिका , स्वातंत्र्यसेनानी राघोजी काळपांडे, प्रतिष्ठानचे गणेश काळपांडे ,सक्षम प्रतिष्ठानचे स्वप्नील थोरात ,किशोर राऊत,सुनील गावंडे यांनी राघवच्या मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.