नवी दिल्ली : प्रशासकीय स्तरावर स्वच्छ भारत अभियानाबाबत सातत्याने प्रचार व प्रसार केला जातो. यासाठी विविध स्तरावरून जाहिराती केल्या जातात. याला सातत्याने चालना देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पण, यात जितकी जनजागृती होईल, त्यापेक्षा अधिक जनजागृती एका व्हिडीओने झाली, ज्यात चक्क वाघाने नदीच्या पाण्यातील प्लास्टिक उचलून ते बाहेर फेकल्याचा क्षण कॅमेराबद्ध झाला!
हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकरी या वाघाचे विशेष कौतुक करत आहेत. देशभरात गावागावांपासून अगदी मेट्रो शहरांपर्यंत कचर्यांचा नायनाट कसा करायचा, असे प्रश्न उभेे ठाकत असताना आणि यामध्ये सातत्याने प्रयत्न सुरू असताना त्याच्या मर्यादाही समोर येत असतात. पण, देशातील सुशिक्षित जनतेला जे कळत नाही, ते जंगलातील एका मुक्या प्राण्याला मात्र अगदी नेमके उमजले आहे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उमटत आहेत.
या व्हिडीओमध्ये हा वाघ चक्क तलावातील प्लास्टिक बाहेर काढताना दिसतो. आता प्रदूषण म्हणजे या प्राण्याला ज्ञात असण्याचे कारण नसेल. पण, या बाटलीमुळे तलावातील पाणी दूषित होईल, ही जाण मात्र त्याला नक्कीच आहे, अशा प्रतिक्रियाही नेटिझन्सनी दिल्या आहेत. या वाघाचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ 1 लाखांपेक्षा अधिक नेटिझन्सनी पाहिला असून, सर्वांनीच या वाघाचं कौतुक केले आहे. या व्हिडीओवर 22 हजारांपेक्षा अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. जंगल सफारीवर गेलेले पर्यटक आपल्या हातामधील पाण्याच्या बाटल्या जंगलातच फेकून देतात. या बाटल्यांमुळे प्रदूषण होते. त्यामुळे अशा पर्यटकांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी काहींनी केली, तर दुसरीकडे वाघाने दाखवलेला समजूतदारपणा चर्चेत आला आहे.