अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वी आयोध्येतील अनेक पुनर्विकसित प्रकल्पांचे उद्धाटन करण्यात येणार आहे. दरम्यान अयोध्येत 2180 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आलेल्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. यासाठी पीएम मोदी शनिवारी ३० डिसेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले.
अयोध्या दौऱ्यादरम्यान नवीन विमानतळ, नवीन पुनर्विकसित रेल्वे स्टेशन, नवीन नागरी रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा शुभारंभ पीएम मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रकल्प अयोध्येतील आणि आसपासच्या नागरी सुविधांच्या सुशोभीकरणात आणि सुधारणेस हातभार लावतील, असे PMO ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अयोध्या पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्टेशनसह नवीन अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनला देखील पीएम मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत, असे देखील ‘पीएमओ’ने नमूद केले आहे.