अकोला, दि. २८ : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. पतंगाच्या खेळाचा आनंद घेताना इतरांच्या जीविताला बाधा पोहोचू नये याची काळजी घेणे महत्वाचे आहे. पर्यावरण व पशूपक्ष्यांच्या रक्षणासाठी तसेच सामान्य नागरिकांना नायलॉन मांज्यामुळे इजा व दुखापती टाळण्याच्या दृष्टीने नायलॉन मांजाचा वापर जिल्ह्यात कुठेही होता कामा नये, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
पर्यावरण संरक्षण कायद्याने नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसे प्रतिबंधात्मक आदेशही निर्गमित करण्यात येतात. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाहीही होते. तथापि, सुजाण नागरिक म्हणून नियमांचे पालन आणि अनुसरण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.