बुलढाणा: समृद्धी महामार्गावर फर्दापूर (मेहकर) टोलनाक्याचे व्यवस्थापन पाहणा-या खासगी कंपनीने गत दोन महिण्यांपासून टोलनाका कर्मचा-यांना कामाचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे कर्मचा-यांनी आज (बुधवार) सकाळपासूनच काम बंद केले आहे. यामुळे वाहनधारकांना टोलनाका तुर्त खुला झाला आहे.
समृध्दी महामार्गावर दरदिवशी हजारो वाहनांचे दळणवळण होते. सद्या दिवाळी सणांच्या सुट्यांमुळे या मार्गावर प्रवासी वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ वाढली आहे. अशातच या मार्गावरील फर्दापूर टोलनाका कर्मचा-यांनी पीएफ व थकित वेतनाच्या मागणीसाठी आज अचानक संप पुकारला आहे. टोलनाका कर्मचारी कामापासून दूर झाले असल्याने वाहनांना टोलनाक्यावर कोणतीही आडकाठी राहिल्याचे दिसत नाही. वाहनधारक हे स्वतः:च टोलनाक्यावरील आडवा दांडा वर करून आपली वाहने पुढे घेऊन जात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, समृध्दी महामार्गावरील फर्दापूर (मेहकर) टोलनाक्याचे व्यवस्थापन रोडवेज सोल्यूशन ही खासगी कंपनी पाहते. या कंपनीने गत दोन महिण्यांपासून टोलनाक्यावरील कर्मचा-यांना कामाचे वेतन दिलेले नाही. दिवाळी सणाला तरी वेतन मिळेल या आशेवर असलेल्या कर्मचा-यांची निराशा झाली. अखेर आज अचानक कामकाजावर बहिष्कार घालण्याचा आक्रमक पवित्रा तेथील कर्मचा-यांनी घेतला. कंपनीविरोधात घोषणाबाजी करीत कर्मचारी संपावर गेले आहेत. पीएफ व थकित पगार मिळाल्याशिवाय कामावर न येण्याचा निर्धार या टोलनाका कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.