वेगवान गाेलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्याचा भेदक मारा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जादूसमोर आज पाकिस्तानचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार बाबर आझम आणि स्टार फलंदाज रिझवान या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने १९१ धावांपर्यंत मजल मारली आहे. ३० षटकांत पाकिस्तानच्या ३ बाद १५६ धावा होत्या. यानंतर अवघ्या ३३ धावांत पाकिस्तानने ६ गडी गमावले. पाकिस्तानच्या संघ अवघ्या ४२.५ षटकांमध्येच तंबूत परतला आहे. मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दाेन बळी घेत अवघ्या १९१ धावांवर पाकिस्तानला रोखले आहे. आता या बहुचर्चित सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतासमाेर १९२ धावांचे लक्ष्य आहे.
भारताला पहिला धक्का, शुभमन गिल बाद
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या ओव्हरमध्ये शुभमन गिलच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. त्याला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने शादाब खान करवी झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत ११ बॉलमध्ये १६ धावांची खेळी केली.
मोहम्मद सिराजचा पाकिस्तानला पहिला झटका
कर्णधार राेहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय गाेलंदाजांनी सार्थ ठरवला. सामन्यातील आठव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सलामीवीर शफिकला बाद करत मोहम्मद सिराजने पाकिस्तानला पहिला झटका दिला. सिराजने शफिकला एलबीडब्ल्यू केले. शफिकने आपल्या खेळीत २४ बॉलमध्ये २० धावांची खेळी केली.
सामन्याच्या १३ व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर इमाम उल हकच्या रूपात पाकिस्तानला दुसरा झटका बसला. त्याला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने विकेटकीपर के.एल. राहूल करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळी ३८ बॉलमध्ये ३६ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार लगावले. सामन्यातील २० ओव्हरमध्ये २ विकेट गमावून पाकिस्तानने १०३ धावा केल्या हाेत्या.
रिझवानच्या मदतीने कर्णधार बाबरने डाव सावरला
दाेन गडी गमावल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर याने रिझवानच्या मदतीने पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. या दाेघांच्या ८२ धावांच्या भागीदारीने पाकिस्तानचा डाव सारवला. ७ चौकार्या फटकावत बाबरने ५८ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. ३० व्या षटकात बाबर आझमच्या रूपात पाकिस्तानला तिसरा झटका बसला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याला क्लीन बोल्ड केले.
पाकिस्तानचा पाय ‘खोलात’, १६६ धावांत निम्मा संघ तंबूत
सामन्याच्या ३३ व्या षटकामध्ये कुलदीपने पाकिस्तानला पाठोपाठ दोन धक्के दिले. या षटकाच्या दुसर्या चेंडूवर त्याने सौद शकीलला एलबीडब्ल्यू करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला. यानंतर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर इफ्तिखार अहमदला क्लीन बोल्ड केले. शकीलने आपल्या खेळीत १० बॉलमध्ये ६ धावांची खेळी केली. तर इफ्तिखार अहमदने आपल्या खेळीत ४ बॉलमध्ये ४ धावांची खेळी केली.
पाकिस्तानचा डाव गडगडला
सामन्याच्या ३४ व्या षटकामध्ये पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज मोहम्मद रिझवानला क्लीन बोल्ड करत बुमराहने पाकिस्तानला मोठा झटका दिला. रिझवानने आपल्या खेळीत ६९ बॉलमध्ये ४९ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ७ चौकार लगावले. सामन्यातील ३६ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बुमराहने शादाब खानला क्लीन बोल्ड करत पाकिस्तानला सातवा धक्का दिला. शादाब खानने आपल्या खेळीत ५ बॉलमध्ये २ धावा केल्या. याच्या आधी ३४ व्या ओव्हरमध्ये मोहम्मद रिझवानला देखील क्लीन बोल्ड केले.
सामन्यातील ४० व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हार्दिक पंड्याने बुमराह करवी मोहम्मद नवाजला बाद करत पाकिस्तानला आठवा धक्का दिला. त्याने आपल्या खेळीत १४ बॉलमध्ये ४ धावांची खेळी केली. सामन्यातील ४० ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर पाकिस्तानला नववा झटका बसला. भारताचा गोलदांज रवींद्र जडेजाने हसन अलीला शुभमन गिल करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत १९ बॉलमध्ये १२ धावांची खेळी केली. दाेन धावांवर खेळणार्या हॅरीस रैफला तंबूत धाडत रवींद्र जडेजाने पाकिस्तानचा डाव गुंडाळला.