नागपूर : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरूवार (दि.१४) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. सतंतधार पावसामुळे विदर्भातील तान्हा पोळा कार्यक्रमावर विरजण पडले आहे. तसेच विदर्भासह राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याचवेळी काही भागात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये आज (दि.१५) मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट म्हणजेच जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ या विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ‘ यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. गणेशोत्सव काही दिवसावर असताना मुसळधार पावसामुळे मूर्तिकार आणि गणेशभक्तांची देखील चिंता वाढविली आहे. परंतु या संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.