अकोला,दि.13: विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’चे आयोजन करण्यात आले असून, त्यात अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन विविध मान्यवरांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा : आमदार रणधीर सावरकर
नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मंत्री मंगलप्रभात लोढा व मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामधे स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यासाठी, इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व बौद्धिक संपदा हक्कासाठी अर्थसहाय्य. ग्रेड चॅलेंज स्टार्टअप वीक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
जिल्ह्यातील नवसंकल्पनांचा शोध, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीचा विकास व्हावा, त्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त रूप मिळावे, त्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयाने सहभागी घ्यावे व आपल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.
संकेतस्थळावर नोंदणी व सहभागाचे आवाहन
राज्य नाविन्यता सोसायटीच्या https://www.msins.in/ या संकेतस्थळामार्फत ‘स्ट़ुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ या स्पर्धेचे समन्वयन करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शासकीय, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यात शिक्षण, प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी या स्पर्धेसाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या संकेतस्थळावर महाविद्यालयाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.
जिल्हयातील जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण संकल्पनाधारक महाविद्यालयीन विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत सहभागी होतील यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने महाविद्यालयांना भेटी देऊन उमेदवारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. शिक्षक, प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा व जिल्ह्यातून अधिकाधिक सहभाग मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 असून त्यानंतर महाविद्यालयीन स्तरावर आणि जिल्हा स्तरावर संकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाचे सहायक संचालक द. ल. ठाकरे यांनी दिली.