पुणे : पुण्यातील रस्त्यांसाठी मेधा कुलकर्णीनी वारंवार मागणी केली. अडचणींवर मात करत चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम केलं. या आधी हजारो कोटी खर्च करूनही या रस्त्याची वाहतूक कोंडीची समस्या सोडवू शकलो नाही. चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी मलेशिया, सिंगापूर अशा परदेशातील तंत्रज्ञानाचा वापर करून हा उड्डाणपूल आम्ही उभारला आहे. भविष्यात पुण्यात चाळीस हजार कोटींचे काम पूर्ण करणार असे आश्वासन नितीन गडकरींनी पुणेकरांना दिले. ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन कर्यक्रमावेळी बोलत होते.
पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील चौक आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. अजित पवार, चंद्रकांत पाटील यांना हवेतून चालणाऱ्या बसचा डेमो दाखवणार असेही गडकरी म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले, पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या. पुणे शहरात मेट्रोला उशीर अभ्यासू लोकांमुळेच झाला. पण आता इतर प्रकल्पांच्या योजनांना लवकर मंजुरी द्या, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.