अकोला,दि.26 : जास्त पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने पिकांचे व मालमत्तेचे नुकसान होते. पूरहानी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने अकोला जिल्ह्यासाठी कृती आराखडा निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. श्री. कुंभार हे अकोला येथील जिल्हाधिकारीपदी मंगळवारी रूजू झाले. यानिमित्त नियोजन सभागृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. कुंभार यांनी रूजू झाल्यावर पहिल्या दिवशी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. त्याची माहिती देताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे होणारी हानी रोखण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृती आराखडा सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात येईल. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानाच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, तीन ते चार दिवसांत ते पूर्ण करण्यात येतील. त्याचप्रमाणे, सानुग्रह अनुदान वितरणही गतीने पूर्ण केले जाईल.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीचा निधी आगामी काळात आचारसंहितेमुळे व्यपगत होता कामा नये. त्यासाठी सर्व नियोजित विकासकामे पूर्णत्वास नेऊन 100 टक्के खर्च करण्यात येईल. जिल्ह्यातील शेतीसंबंधीचे प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार, पोकरासारख्या विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देऊ. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासारखी मोठी संस्था अकोला येथे आहे. तेथील तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून पुढील कालावधीत सकारात्मक बदल घडविण्याचा आपला प्रयत्न राहील.
अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाट्यगृह, सांस्कृतिक वारसास्थळे आदी व नागरी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व कामे पूर्णत्वास नेऊ. आवश्यक त्या सर्व कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू. नियोजनानुसार कामे पूर्ण होण्यासाठी प्रशासनात गतिमानता आणली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई महापालिकेत असताना शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी राबवलेली ‘मिशन ॲडमिशन’ मोहिम, टेरेस गार्डन, कौशल्य विकास कार्यक्रम आदींची माहितीही त्यांनी दिली.