अकोला, दि. 25: जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. बाळापूर तालुक्यातील रिधोरा, निमकर्दा, उरळ आदी गावांना त्यांनी भेट दिली व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. बाळापूरचे तहसीलदार राहूल तायडे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने पंचनामे तातडीने पूर्ण करून तसा अहवाल सादर करावा. नुकसानाची सविस्तर नोंद घ्यावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी दिले.
अतिवृष्टीने निमकर्दा येथील पुलाचे झालेले नुकसान व विविध गावांतील शेतीच्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.