मुसळधार पावसामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशाच्या काही भागात टोमॅटोच्या किरकोळ किमती प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बंगळूरमध्ये टोमॅटोचा दर प्रति किलो १०० रुपयांवर तर दिल्लीत ८० रुपयांवर गेला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत हा दर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे दर वाढले आहेत. पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने दर वाढले असल्याचे सांगितले जात आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात प्रति किलो ३ ते ५ रुपये आणि किरकोळ दर १० ते २० रुपये होते. पण जूनमध्ये त्यात अचानक वाढ झाली आणि आता दर १०० रुपयांवर आहे. टोमॅटोचे दर गेल्या आठवड्याभरात तिपटीने वाढले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्याने बंगळूर येथून टोमॅटोची आवक होत आहे. मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. दिल्लीचे व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहेत.
टोमॅटोच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा नवे पीक बाजारात येईल तेव्हाच दर कमी होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हिमाचल प्रदेश आणि अन्य राज्यांत पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे
“गेल्या आठवड्यात टोमॅटोचा भाव प्रति किलो ४०-५० रुपये दरम्यान होता. या आठवड्यात हा भाव १०० रुपये किलो आहे. हा दर अचानक वाढला आहे. इतर भाज्यांचे भावही चढे आहेत,” असे बंगळूरमधील रहिवाशांनी बोलताना म्हटले आहे.
का वाढले दर?
एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळादरम्यान झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये उष्म्यामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी, देशातील अनेक राज्यांतील मंडईंमध्ये टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले, असल्याचे बाजारातील जानकारांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्य नागरिकांना फटका
दररोजच्या जेवणात वापरला जाणाऱ्या टोमॅटोने महाराष्ट्रातील नागपूरमध्ये प्रति किलो शंभरी गाठली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोची चव चाखणे कठीण झाले आहे. टोमॅटो १०० ते १२० रुपये किलोने विकला जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे.
घ्यायचा काय भाव आणि विकायचा कितीला?
नागपूर जिल्ह्यातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात टोमॅटो गाड्यांची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. महात्मा फुले, कॉटन मार्केटमध्येदेखील चढ्या दराने टोमॅटो विकले जात असल्याने किरकोळ विक्रेत्यांना टोमॅटो घ्यायचा काय भाव आणि विकायचा कितीला? असा प्रश्न पडला आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीरदेखील बरीच महागली आहे. सर्वसामान्य नागरिक टोमॅटो खरेदी करण्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. मालाची आवक कमी आणि लग्नसराई जोरात असताना टोमॅटोचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी, किरकोळ विक्रेत्यांनी व्यक्त केली.